अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल चौकातील स्टेट एटीएम या खाजगी कँपणीच्या एटीएम सेंटरमध्ये चक्क ज्युस सेंटर थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. एटीएम सेंटर मध्ये एका वेळी एकाच व्यक्तीला प्रवेश देण्याचा नियम असतांना इथं मात्र हा नियम पायदळी तुडवला जात आहे.
अमरावतीच्या गर्ल हायस्कूल चौकात फेमस ज्यूस सेंटर आहे. या जूस सेंटरच्या मागे असलेल्या एका खोलीमध्ये स्टेट एटीएम सेंटर आहे. या एटीएमच्या खोलीमध्ये या जूस व्यावसायिकाने आपल्या दुकानाच्या खुर्च्या ठेऊन जूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अमरावतीत सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार मागील अनेक वर्षांपासून सूर आहे. महत्वाच्या ठिकाणी हे एटीएम असल्याने शेकडो ग्राहक इथं पैसे काढण्यासाठी येत असतात. कदाचित जूस सेंटर मधील बसलेल्या ग्राहकांना जर पैशाची लुटमार केली तर त्याला जबाबदार कोण असा सवालही ग्राहकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या दुकानदारावर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.