अमित ठाकरे यांच्या पराभवाचे धक्कादायक कारण! असा विजयी झाला ठाकरेंचा उमेदवार

Amit Thackeray : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय खेचून आणलाय. महेश सावंतांचा विजय झाला. 

वनिता कांबळे | Updated: Nov 23, 2024, 10:08 PM IST
अमित ठाकरे यांच्या पराभवाचे धक्कादायक कारण! असा विजयी झाला ठाकरेंचा उमेदवार title=

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : ठाकरे कुटुंबातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे अमित ठाकरे  दुसरे सदस्य असल्यानं  माहीम मतदारसंघाच्या निकालाकडे लागल्या होत्या. मात्र, राजपुत्र अमित ठाकरे यांना पहिल्याच निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. जाणून घेऊया अमित ठाकरे यांच्या पराभवाचे कारण. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून दारूण पराभवाचा सामना करावा लागलाय.  शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना युबीटीकडून महेश सावंत हे दोन उमेदवार रिंगणात होते.  
सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे असा सामना रंगेल, अशी चुरशीची लढत होईल,अशी अपेक्षा होती. मात्र, महेश सावंत यांनी बाजी मारत माहीमच्या मतदार संघातून विजय मिळवलाय. तर अमित ठाकरे हे तिस-या क्रमांकावर फेकले गेलेत. 

सदा सरवणकर यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र,सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यानं ही निवडणूक अमित ठाकरेंसाठी कठीण जाईल,अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यान हिंदू मतविभाजनाचा फटका अमित ठाकरे यांना बसलाय. तसेच सावंत यांना मुस्लिम मत मिळाल्यानं त्याचा विजय सुकर झाला. 

अमित ठाकरेंना पराभव मान्य...

सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत अमित ठाकरे यांनी परभाव मान्य केला आहे.  माहिम, दादर आणि प्रभादेवीतील जनतेचा कौल मला मान्य आहे…आज विधानसभा निवडणुकीत माझ्या जनतेने जो कौल दिला, तो मी विनम्रपणे आणि अत्यंत आदराने स्वीकारतो. गेली अनेक वर्षे या प्रभागातील अगदीच बेसिक गरजांसाठी लोकांचा संघर्ष बघितला. याच संघर्षातून उभ्या राहिलेल्या विचारांनी, प्रभागाच्या विकासासाठी आणि बदलासाठी आपण एक नवा अध्याय लिहावा, केवळ या हेतूने मी या निवडणुकीत उतरलो होतो. मात्र, कदाचित येथील जनतेच्या मनात काही वेगळे असावे. हा कौल मला हेच शिकवतोय की, अजून खूप काम करायचं आहे. अजून मेहनत घ्यायची आहे. अजून संघर्ष करून माझं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. आपला विश्वास मिळवण्यासाठी अजून झटायचं आहे. माझी ही लढाई कधीच राजकीय सत्ता मिळवण्यासाठी नव्हती… कारण ही लढाई कोणा राजपुत्राची नसून, ती होती एका सामान्य कार्यकर्त्याची - जो सर्वांसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतो. मला फक्त आपल्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आणायचं होतं.आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; एक नवी सुरुवात आहे. तुमच्यासाठी, तुमच्या विश्वासासाठी, माहिम, दादर, प्रभादेवी आणि सबंध महाराष्ट्राच्या विकासासाठी, मी २४ तास झटत राहीन, हा माझा शब्द आहे. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला मतदान केलं, त्यांचे मनापासून आभार. तुमचा विश्वास वाया जाणार नाही. मी वचन देतो - तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू!

आपलाच, अमित ठाकरे

अशी पोस्ट अमित ठाकरे यांनी केली आहे.