कोरोना होऊन गेलाय पण कळाला नाही? धक्कादायक साईड इफेक्ट आला समोर

कोरोना होऊन गेला तरी गाफील राहू नका.

Updated: Dec 25, 2020, 05:16 PM IST
कोरोना होऊन गेलाय पण कळाला नाही? धक्कादायक साईड इफेक्ट आला समोर title=

विशाल करोळे, औरंगाबाद : तुम्हाला कोरोना होऊन गेलाय का? कोरोना होऊन गेलाय पण तुम्हाला माहीतच नाही? कोरोना होऊन गेल्यानंतरही तुम्हाला काही दुखतंय का? आम्ही हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारतोय. कारण कोरोनाचा एक धक्कादायक साईड इफेक्ट आता समोर आलाय. 

डॉक्टरही गेले चक्रावून

कोरोना होऊन गेला म्हणजे आता आपण इम्युन झालो, असं म्हणून बिनधास्त होणार असाल तर थोडं थांबाच. कारण हा कोरोना बऱ्याच जणांना भयानक साईड इफेक्टस देऊन जातोय. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये हेडगेवार हॉस्पिटलमध्ये एक महिला आली... तिची कंबर दुखत होती... काही केल्या कंबरदुखी थांबेना म्हणून एमआरआय केला आणि डॉक्टर चक्रावून गेले. 

या महिलेच्या शरीरात माकडहाडापासून दोन्ही हात, पोट, किडनीशेजारी पस झाला होता. रक्तामध्येही पस शिरला होता. कुठल्याही क्षणी हात पाय अध झाले असते. जीव जाण्याचाही धोका होता. एकदम एवढा पस कुठून आला हे शोधायला. अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तिला कोरोना होऊन गेल्याचं समोर आलं. कोरोनाचाच हा साईड इफेक्ट असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे. 

संपूर्ण शरीरात पस होणं याला कोरोनाचा साईड इफेक्ट म्हणायचं का, याबद्दल वेगवेगळी मतं आहेत.

कोरोना झालेल्या रुग्णांना अशा प्रकारे पस झाल्याच्या सहा घटना जर्मनीत समोर आल्यायत. भारतातली ही पहिलीच केस आहे. या महिलेचं ऑपरेशन करण्यात आलं. त्यानंतर ती दोन दिवस व्हेंटिलेटरवर होती. आता त्या पूर्ण बऱ्या झाल्या आहेत.

एक मात्र नक्की. कोरोना होऊन गेलाय म्हणून गाफील आणि बिनधास्त राहू नका. कोरोना अनेक साईड इफेक्टस घेऊन येतोय. त्यामुळे एवढंसं काही झालं तरी दुखणं अंगावर काढू नका. वेळीच डॉक्टरकडे जा.