पूरग्रस्त जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवणे आवश्यक : ललित गांधी

कोल्हापूर, सांगली सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना निकष न लावता विशेष बाब म्हणून दुकानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी ललित गांधी यांनी केली आहे.

Updated: Aug 2, 2021, 08:33 PM IST
पूरग्रस्त जिल्ह्यातील दुकानांची वेळ वाढवणे आवश्यक : ललित गांधी title=

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील दुकानांची वेळ आठ वाजेपर्यंत पाठवून देण्याची घोषणा त्यांच्या सांगली दौऱ्यात केली आहे. ही वेळ वाढवून देताना राज्यातील सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

वेळ वाढवून देताना सरकारने काही निकष ठरवले असतील तर किमान पूरग्रस्त कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सहा जिल्ह्यांना निकष न लावता विशेष बाब म्हणून दुकानाची वेळ वाढवून द्यावी अशी मागणीही ललित गांधी यांनी केली आहे. 

पूरग्रस्त जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडील नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे किमान व्यापार अधिक वेळ करता आला तर या व्यापाऱ्यांना पुन्हा उभारी घेण्यास थोडा हातभार लागेल. म्हणून शासनाने या जिल्ह्याविषयी विशेष बाब म्हणून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ही ललित गांधी यांनी केले.

11 जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या गाइडलाइन्सनुसार आता रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहणार आहेत. शनिवार रविवारी मात्र विकेण्ड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नियम वेगळे ठेवण्यात आले आहेत. 

कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड या जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहेत.