मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फटून अनेकांचे संसार वाहून गेले होते. अनेकांना आपले कुटुंब गमवावे लागले होते. आता तिवरे धरणग्रस्त गाव श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट दत्तक घेणार आहे. तिवरे धरण दुर्घटनेत उद्धस्त झालेल्यांची घरे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट उभारून देणार आहे. याशिवाय तिवरे गावातील शाळा देखील सिद्धीविनायक मंदिर बांधून देणार आहे.
तिवरे गावाला मदत करण्यात यावी, यासाठी म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत लेखी निवदेनाद्वार मागणी केली होती. या मागणीचा विचार करत तिवरे धरण दुर्घटनेत उद्धस्त झालेल्यांची घरे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास उभारून देणार आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सामत यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार आदेश बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत तिवरे गावाला मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच तिवरे गावातील शाळा तसेच महाराष्ट्रातील अनाथ गतीमंद मुलांचं संगोपनही सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट करणार आहेत. ज्या अनाथ गतीमंद मुलांना कुणाचाच आधार उरला नाही. अशा सर्व गतीमंद मुलांचं संगोपन आता सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार आहे, अशी माहिती आदेश बांदेकर यांनी दिली. तिवरे गावातील घरे बांधून देण्यासोबतच गावातील शाळा देखील सिद्धीविनायक मंदिर न्यास बांधून देणार आहे. त्यासाठी भरीव निधीची तरतूद करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, त्यामुळे धरणग्रस्तांसाठी नवी आशा निर्माण झाली आहे.