सीरम - भारत बायोटेक व्हॅक्सीनवरुन उफाळलेल्या वादावर पडदा

 सीरम (Serum) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्यामार्फत एकत्रित परिपत्रक जारी, व्हॅक्सीनच्या मान्यतेवरुन उफाळून आलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

Updated: Jan 5, 2021, 05:07 PM IST
सीरम - भारत बायोटेक व्हॅक्सीनवरुन उफाळलेल्या वादावर पडदा  title=

पुणे : सीरम (Serum) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) यांच्यामार्फत एकत्रित परिपत्रक जारी, व्हॅक्सीनच्या मान्यतेवरुन उफाळून आलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरोना लस परिणामकारकतेच्या मुद्यावरुन सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) प्रमुखांमध्ये वाद उफाळला होता. या दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या शाब्दीक चकमकीनंतर त्यांच्यातील वाद मिटविण्यात आला आहे. आता दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. लस उपलब्ध करुन देण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प दोन्ही कंपन्यांनी बोलून दाखवला आहे.

फायझर, मॉडर्ना आणि आणि ऑक्सफर्डच्या कोरोना लस वगळून अन्य लस ‘केवळ पाण्याइतक्या सुरक्षित’ अशी टीका ‘सीरम’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केली होती. त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. मात्र, लोकांचा जीव महत्वाचा आहे, असे सांगत दोन्ही कंपन्यांनी एकत्रित काम करण्याचे जाहीर केले आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचंय, एकमेकांशी नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. 

कोरोनाची लस अजून पुरती बाजारात आलीसुद्धा नाही, तोच  कुठली लस चांगली याचं युद्ध सुरू झाले. भारत बायोटेकला लवकर परवानगी का देण्यात आली, असा काहींचा आक्षेप होता. 

हे आहेत आक्षेप 

कोव्हॅक्सिनने अजून फेज 3 ट्रायल्स केलेल्या नाहीत
परवानगी घाईघाईत मिळाली, हे धोकादायक ठरू शकतं
आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी स्पष्टीकरण द्यावं
चाचण्या पूर्ण होईपर्यंत कोव्हॅक्सिनचा वापर थांबवणं गरजेचं

भारतात अॅस्ट्राझेनेकाचा तोवर वापर व्हावा, असं ट्विट काँग्रेस नेते शशी थरुर यांनी केले. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले कोव्हॅक्सिनला संपूर्ण तपासणीअंतीच परवानगी मिळाली.या मंजुरीतून सिद्ध होते आहे की भारताला अतिरिक्त लस मिळाली आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेंट विरोधातही कोव्हॅक्सिन लढण्यास सक्षम आहे. अफवा पसरवणाऱ्यांनी आधी याची माहिती घ्यावी असे म्हटले आहे.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये लसयुद्ध जुंपलेलं असतानाच सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकमध्येही आरोप-प्रत्यारोप रंगले. फक्त सीरमची लस चांगली आहे, बाकी सगळं पाणी आहे असं एका मुलाखतीत सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांनी म्हटलं होतं. त्यानंतर भारत बायोटेकला लस तयार करण्याचा समृद्ध अनुभव आहे. उगाचच कुसरवू नये, असं भारत बायोटेकचे जॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर कृष्णा इल्ला यांनी सुनावले.

सीरम आणि भारत बायोटेकचे हे वाद चव्हाट्यावर आल्यावर दोन्ही संस्थांनी या वादावर पडदा टाकत संयुक्त पत्रक जारी केलं. लस देऊन लोकांचा जीव वाचवण्यावरच दोन्ही कंपन्यांचा भर असेल. लसीचं उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर आता आम्ही लक्ष देणार आहोत, असे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. 

कोरोनाच्या काळात लोक आधीच टेन्शनमध्ये असताना हे लसयुद्ध आणखी कन्फ्युजन वाढवणारं होते. आपल्याला कोरोनाशी लढायचंय एकमेकांशी नाही, हे या दोन्ही कंपन्यांना उशिरा का होईना, समजले, अशी आशा आहे.