पुणे : ज्येष्ठ समाजसेविका आणि पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अनेक अनाथांची माय झालेल्या या माऊलीला आज शासकीय इतमामात भावपूर्ण निरोप दे्यात आला. पुण्यातील ठोसरपागा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान अग्निसंस्काराऐवजी त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. त्यामुळे त्यांना दफण का करण्यात आलं याची चर्चा आहे. (Sindhutai Sapkal Last journey)
सिंधुताई सपकाळ यांनी महानुभाव पंथाची (Mahanubhav panth) दीक्षा घेतली होती. त्यामुळे या पंथामध्ये निधनानंतर दफन करण्याची प्रथा आहे. पंथाच्या परंपरेनुसारच आपले अंत्यसंस्कार व्हावेत, अशी सिंधुताईंची देखील इच्छा होती. त्यामुळेच त्यांचे पार्थिव दफन करण्यात आले.
कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अंत्ययात्रेच्या दरम्यान श्री चक्रधर स्वामींच्या नावाचा जप आणि श्रीमद्भगवतगीतेच्या श्लोकांचंही उच्चारण करण्यात आलं.
महानुभाव पंथाचे संस्थापक असलेले श्री चक्रधर स्वामी यांनी खडकुली येथे वास्तव्यास असताना एका भक्ताचं निधन झालं. तेव्हा स्वामींनी त्याचा दफनविधी करण्यास सांगितला. तेव्हापासून महानुभाव पंथात याच पद्धतीनं अंत्यविधी होत असतो. या विधीला 'भूमीडाग' असे म्हटले जाते. पण महानुभाव पंथात दफन केलेल्या व्यक्तीची समाधी उभारली जात नाही.