विद्यार्थ्यांची ट्रेन चुकू नये म्हणून जीप पळवणं जीवावर बेतलं, भरधाव ट्रेलरने 60 फूट फरफटत नेलं; 6 जण ठार

भिवंडीत मौजे पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर (MH 48 T 7532) व काळी पिवळी जीप (MH04E 1771) यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात 6 जण ठार झाले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 18, 2023, 02:09 PM IST
विद्यार्थ्यांची ट्रेन चुकू नये म्हणून जीप पळवणं जीवावर बेतलं, भरधाव ट्रेलरने 60 फूट फरफटत नेलं; 6 जण ठार title=

भिवंडीत मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) खडवली फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रेलरने काळ्या पिवळ्या जीपला दिलेल्या धडकेत 6 जण ठार झाले आहेत. तसंच 6 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. मंगळवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यात ट्रेलरने जीपला फरफटत नेल्याचं दिसत आहे. दरम्यान, राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानभवनात ही माहिती दिली. तसंच जखमींचा खर्चही राज्य सरकार उचलणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीत मौजे पडघा खडावली फाट्याजवळ कंटेनर (MH 48 T 7532) व काळी पिवळी जीप (MH04E 1771) यांच्यात धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर तेथील स्थानिकांनी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केलं. नंतरही पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. 

अपघातग्रस्त जीपमधून विद्यार्थी प्रवास करत होते. त्यांची ट्रेन चुकू नये यासाठी जीपचालक घाई करत होता. जीपचालक वेगात जात असतानाच त्याने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी समोरील दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रेलरकडे त्याने दुर्लक्ष केलं. त्याच ट्रेलरने वेगात जीपला धडक दिली आणि अक्षरश: फरफटत नेलं. जवळपास 60 फूटापर्यंत जीप ट्रेलरसह फरफटत गेली. अपघात इतका भीषण होता की, 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 6 जण जखमी आहेत. 

मयत व्यक्तींची नावे

१) चिन्मयी विकास शिंदे - वय १५ - मयत 
२) रिया किशोर परदेशी - मयत 
३) चैताली सुशांत पिंपळे - वय २७ - मयत 
४)संतोष अनंत जाधव - वय ५० - मयत 
५)वसंत धर्मा जाधव - वय ५० - मयत 
६) प्रज्वल  शंकर  फिरके - मयत 

जखमींची नावे

१)दिलीप कुमार विश्वकर्मा वय २९ जखमी 
२)चेतना गणेश जसे वय १९ जखमी 
३) कुणाल ज्ञानेश्वर भामरे वय २२ जखमी 

जखमींना मायरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

राज्य सरकारकडून मदत जाहीर

अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर कऱण्यात आली आहे. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानभवनात ही माहिती दिली आहे.