ठाण्यात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, तब्बल 26 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

व्हेल माशाची उलटी समुद्रात तरंगणारे सोनं मानलं जातं, सुगंधित उत्पादनं तसंच औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो

Updated: Jul 12, 2021, 06:30 PM IST
ठाण्यात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, तब्बल 26 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त title=

कपील राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाणे वनविभागाच्या पथकाने  मोठी कारवाई केली असून मुंबई उपनगरातील अंधेरी आणि मालाड इथून 5 जणांना ठाणे वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 26 कोटी रुपयांची व्हेल माशांची उलटी अर्थात अंबरग्रीस जप्त केलं आहे. एकूण 26 किलो वजनाची व्हेल माशाची उलटी असून त्याचा उपयोग महागडं अत्तर बनविण्यात येत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मोठी मागणी आहे. याची खरेदी-विक्री हे वन्यप्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी इथं येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. ज्याच्या आधारे, उप वन संरक्षक गजेंद्र हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कंक, वन अधिकारी देशमुख, आरएफओ शहापूर, वनपाल रवींद्र तवर, नारायण माने, गणेश परहर, रामा भांगरे यांच्या पथकाने तपास सुरू करून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून या पाच जणांना अटक केली. 

आणखी काही किलो अंबरग्रीस बाजारात तस्करी करता आणल्याची माहिती वन विभागाला मिळाली असून त्या दिशेने तपास सुरु असल्याचं वन अधिकारी संतोष कंक यांनी सांगितलं.