नीलेश खरमरे, भोर, पुणे : साप आणि उंदीर. एकमेकांचे जानी दुश्मन... पण हे जानी दुश्मन चक्क जिवलग दोस्त बनल्याचे दुर्मिळ दृश्य भोरमध्ये पाहायला मिळाले. साप आणि उंदराची ही अनोखी दोस्ती. भोरमधील जय आणि वीरू. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. गवत्या जातीचा हिरवा साप आणि उंदीर. एकमेकांचे कट्टर दुश्मन. उंदीर हे तर सापाचं आवडतं भक्ष्य. उंदराची शिकार करून त्याला खाणारा साप सर्वांनीच पाहिला असेल. पण उंदराला पाठीवर घेऊन फिरवणारा साप कदाचित तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल.
साप आणि उंदराची दोस्ती होण्याचे कारण देखील जरा विचित्रच होते. भोरमध्ये राहणारे राठोड यांच्या घरासमोरच्या पाण्याच्या हौदात साप आणि उंदीर दोघेही पडले. दोघांचीही जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होती. एकमेकांना आधार देत ते पाण्याबाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. उंदीर सापाच्या पाठीवर बसला होता आणि सापही त्याला पडू देत नव्हता. अगदी त्यांना बाहेर काढल्यानंतरही उंदीर सापाच्या पाठीवरून खाली उतरायचे नाव घेत नव्हता.
भक्ष्य आणि शिकारी यांच्यातली ही मैत्री पाहिल्यानंतर लाइफ ऑफ पाय सिनेमाची आठवण झाली. फरक एवढाच की, सिनेमातली वाघ आणि मुलाची कथा काल्पनिक होती. तर साप आणि उंदराची ही मैत्री वास्तवातली होती.