सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

 जखमींना इंदापूरजवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे

Updated: Nov 28, 2021, 10:04 AM IST
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांनी गमावला जीव

पंढरपूर: सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचा माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार माढा तालुक्यातील भीमानगर पुलाजवळ रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला.तांदळाची पोती वाहतूक करणारा ट्रक आणि मळी वाहतूक करणारा टँकर यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मळीचा टँकर इंदापूरहून सोलापूरकडे निघाला होता.सोलापूर जिल्हा हद्दीतील माढा तालुक्यात भीमा नगर येथे एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर हा टँकर आला असता समोरुन येणारा तांदळाचा ट्रक रस्त्यावरील दुभाजकाला धकडून समोरून येणा-या या टँकरवर जोरात आदळला.

ट्रकच्या केबिन मधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर गंभीर जखमी आहेत. जखमींना इंदापूरजवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.