सोलापुरात भाजपला राष्ट्रवादी- सेना सदस्यांची साथ, उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीची सत्ता कायम राखता आली आहे.  

Updated: Dec 31, 2019, 05:08 PM IST
सोलापुरात भाजपला राष्ट्रवादी- सेना सदस्यांची साथ, उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का title=
संग्रहित छाया

सोलापूर : येथील जिल्हा परिषदेत भाजप समविचारी आघाडीची सत्ता कायम राखता आली आहे. तर महाराष्ट्र विकासआघाडीचा पराभव झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, प्रतिष्ठेची केलेल्या जिल्हा परिषदेत मोहिते पाटील यांनी बाजी मारत आपली खेळी यशस्वी केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज जिल्हा परिषद सभागृहात निवडणूक पार पडली. भाजप समविचारी आघाडीकडून करमाळ्यातील अनिरुद्ध कांबळे यांनी अध्यक्ष पदासाठी तर मंगळवेढ्यातील दिलीप चव्हाण यांनी उपाध्यक्ष पदासाठी बाजी मारली.

महाविकास आघाडीने माळशिरसचे त्रिभुवन धाईंजे यांना अध्यक्ष पदासाठी तर बाळराजे पाटील यांना उपाध्यक्ष पदासाठी संधी दिली होती. ६८ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत प्रथमच अनुसूचित जाती प्रवर्गाचे अनिरुद्ध कांबळे ३७ मते मिळवून अध्यक्ष तर दिलीप चव्हाण ३५ मते मिळवून उपाध्यक्ष झाले. माळशिरसच्या मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी च्या चिन्हावर निवडून आलेल्या सात सदस्यांची भूमिका निर्णायक ठरली. भाजपचे १४ सदस्य, शिवसेनेचे एकूण पाच सदस्य होते त्यापैकी करमाळा मधील ४ सदस्यांनी भाजपसोबत जाण पसंत केले. त्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. मंगळवेढ्यातील समाधान आवताडे यांनी सुध्दा भाजपला पाठींबा दिला. सांगोल्यातील महायुतीमधील दोघांनी भाजपला पाठींबा दिला. पंढरपूरमधील परिचारक समर्थक विकासआघाडी सदस्यांनी भाजपसोबत जाण पसंत केले. त्यामुळे भाजपला यश मिळाले आहे. 

राष्ट्रवादीच्या  २३ सदस्यांपैकी माळशिरसमधील सात सदस्य भाजप सोबत गेल्याने त्यांचे संख्याबळ कमी झाले होते. काँग्रेससह, शेकाप आघाडीचे पाच सदस्य, शिवसेनेचा एक सदस्य यांची २९ मते महाविकास आघाडीला पडली. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत गेलेल्या करमाळ्याच्या रश्मी बागल, बार्शीचे दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी महाविकास आघाडी सोबत राहणे पसंत केले. तर सांगोल्यातील महायुती सदस्य भाजपसोबत राहिल्याचे दिसले.

पहिल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी असलेल्या मोहिते पाटील यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने समविचारी आघाडी तयार केली होती. आता त्याच समविचारी आघाडीला सोबत घेऊन मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीचा पराभव करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झटका दिला आहे.