close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अखेर दीर्घ काळ लांबणीवर गेलेला पाऊस परतीच्या वाटेवर

५९ वर्षांत पहिल्यांदाच परतीची वाट लांबली..

Updated: Oct 10, 2019, 08:18 AM IST
अखेर दीर्घ काळ लांबणीवर गेलेला पाऊस परतीच्या वाटेवर

मुंबई : देशाच्या दक्षिणपश्चिमी पावसाने अखेर परतीला सुरूवात केली आहे. दरवर्षीपेक्षा यंदा परतीचा पाऊस हा 40 दिवस उशिराने आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 1960 नंतर हे पहिल्यांदा असं होतं आहे. परतीच्या पावसाने तब्बल 1 महिना उशिर केला आहे. 

बुधवारी हवामान खात्याने पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानमधून पाऊस परतत असल्याची घोषणा केली. त्यांच्यामाहितीनुसार, मॉन्सून आता उत्तर भारतच्या इतर भागात आणि मध्य भारतात जात आहे. सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबर रोजी मान्सून परतीच्या प्रवासाला सुरूवात करतो. आणि 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून माघारी फिरतो. मात्र यावेळी मान्सून परतीच्या प्रवासालाच तब्बल 1 महिना उशिर झाला. त्यामुळे आणखी एक महिना परतीचा पाऊस असणार आहे. 

1961 मध्ये असाच मान्सून होता. तेव्हा देखील 1 ऑक्टोबरपासून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला होता. यावर्षी देशात अनेक ठिकाणी मान्सून सक्रीय राहिला. बंगालच्या खाडीत कमी दबाव राहिल्यामुळे मान्सून खूप दिवस ऍक्टिव राहिल्याचं म्हटलं जातं आहे. 

यंदा जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात मान्सूनने देशासह महाराष्ट्र आणि मुंबईला चांगलेच झोडपून काढले. देशभरात चार महिन्यात 110 टक्के पावसाची नोंद झाली असून महाराष्ट्रातच 32 टक्के अधिकच्या पावसाची नोंद झाली आहे. 

मुंबईत आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण 

11 ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मुंबईतही गुरूवारी आणि शुक्रवारी ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.