पारसिक रेल्वे बोगद्याची पुरती दुरवस्था

कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : पाऊस तर दाखल झाला आहे. मात्र रेल्वे प्रशासनाची पावसाळ्यापूर्वीची तयारी काही  पूर्ण झालेली नाही. नेमकं हेच घडलंय ठाण्यातल्या पारसिक बोगद्याबाबत. कधीही ढासळेल अशी चिंताजनक स्थिती पारसिक बोगद्याची असल्याचं जाणकार सांगतात.  ठाण्यातल्या कळवा आणि मुंब्रामधल्या पारसिक रेल्वे बोगद्याची अवस्था आधीच खराब आहे. त्यात या बोगद्यावर घरं आहेत, सोबतच आजूबाजूला साचलेला कचराही आहे. हे कमी म्हणून की काय अनेक वर्षं या बोगद्याची डागडुजीच केलेली नाही. त्यामुळे कमकुवत झालेला हा बोगदा कधीही ढासळू शकतो.

अनेक उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची येजा असलेल्या पारसिक बोगद्याची डागडुजी युद्धपातळीवर करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांनी केली आहे. सुदैवानं कोणतीही मोठी दुर्घटना या बोगद्यात घडलेली नाही. मात्र एखादा अनुचित प्रकार घडल्यावरच रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडणार का हा प्रश्न आहे.