SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.   

Updated: Feb 3, 2023, 04:23 PM IST
SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर  title=
SSC Board Exam 2023 students will get hallticket from monday 6 th february

SSC Board Exam 2023 : दहावीच्या परीक्षेसाठी तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी आणखी जोमानं सुरु करा कारण, परीक्षेसाठीचं हॉलतिकीट मिळण्याची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती दिली आहे. माहितीनुसार विद्यार्थ्यांना 6 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजल्यापासून हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध असतील. 

ऑनलाईन उपलब्ध असणारी ही हॉल तिकीट शाळांनीच विद्यार्थांना प्रिंट करून देणं अपेक्षित असेल. त्यासंदर्भातही शाळांना शिक्षण मंडळाकडून काही सूचना करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये हॉल तिकीटाच्या प्रिंटवर अपेक्षित स्वाक्षरी व्यवस्थित आहेत की नाही इथपासून विद्यार्थ्यांकडून शुल्क न आकारण्याच्या सूचनांचा समावेश आहे. 

हॉल तिकीटांमध्ये काहीही चुका असल्यास काय करावं? 

2 ते 25 मार्च या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. परीक्षांपूर्वी 6 फेब्रुवारीला विद्यार्थ्यांना दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट मिळतील. प्रत्येक माध्यमानुसार हॉल तिकीटांमध्ये काही महत्त्वाचे बदल असतील किंवा काही चुका सुधारणं अपेक्षित असेल तर, याच्या दुरुस्तीसाठी शाळांनी विभागीय मंडळांशी संपर्क साधावा. हे करत असताना शाळांनी विद्यार्थ्यांचा फोटो, नाव, जन्मतारीख इत्यादी दुरुस्त्या करून त्याची प्रत तातडीनं विभागीय मंडळाकडे पाठवावीत. 

हेसुद्धा वाचा : 7th Pay Commission : पगाराची बातमी; सरकारी कर्मचाऱ्यांना यावेळी होणार तोटा 

 

दरम्यान, विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाल्यास शाळांनी त्यांना आणखी एक प्रिंट देणं अपेक्षित असेल. पण, या प्रतीवर 2nd Copy असं नमूद करावं. 

परीक्षेला उशिरानं पोहोचण्याचं धाडस करूच नका 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी वेळेतच परीक्षा केंद्रावर हजर रहावं. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल अशी ताकीदच शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. अनेकदा उशिरा पोहोचण्याच्या वाव मिळाल्यास विद्यार्थी त्याचा गैरफायदा घेतात ही बाब निदर्शनास आल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत 10 मिनिटांनी उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा कक्षात प्रवेश दिला जात होता. पण आता मात्र ही मुभाही नसेल त्यामुळं परीक्षेसाठी निघताना हाती जास्त वेळ ठेवूनच निघा असा सल्लाही विद्यार्थी मित्रांना देण्यात येत आहे.