एसटी कर्मचाऱ्याने आगारातच केली आत्महत्या; वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रातून खळबळजनक खुलासा

ST Employee Suicide: एसटी कर्मचाऱ्याने आगारातच विष पिऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्यांनी एक सुसाइड नोटदेखील लिहली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 20, 2024, 07:43 AM IST
एसटी कर्मचाऱ्याने आगारातच केली आत्महत्या; वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रातून खळबळजनक खुलासा title=
ST employee committed suicide due to transfer in sangli

ST Employee Suicide: एसटी कर्मचाऱ्याने कवठेमहाकाळ आगारात विष पिऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जावेद नगारजी असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बदली होत नसल्याच्या नैराश्यातून जावेद यांनी हे पाऊल उचललं आहे. तसंच, आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाइड नोटदेखील लिहली आहे. यात त्यांनी आगारप्रमुखांवर आरोप केले आहेत. 

जावेद नगारजी याने आत्महत्या करण्यापूर्वी लेखी इशारा पत्र देखील एसटी आगार सांगली जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांकडे पाठवलं होतं. यात आगारातील वरिष्ठांकडून मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करत बदली करण्याची मागणी केली होती. मात्र तरी देखील बदली होत नसल्याच्या नैराशातून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळं कवठेमहाकाळ एसटी आगारात खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी कर्मचाऱ्याने एसटी आगार व्यवस्थापकानेच बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसंच, संबंधीत एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचे नातेवाईकानी म्हटलं आहे. 

जावेद कवठेमहाकाळ आगारात  सहाय्यक म्हणून काम करत होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांची जत येथून कवठेमहाकाळ येथे बदली झाली होती. मात्र ते या बदलीमुळं नाराज होते. त्यांनी पुन्हा जत येथे बदली करण्यात यावी यासाठी जिल्हा आगारप्रमुखांकडे दोनदा विनंती अर्ज पाठवले होते. मात्र, आगारप्रमुखांनी जिल्हा नियंत्रकांकडे दोन्ही अर्ज पाठवले नसल्याची त्यांची तक्रार होती. त्यामुळं ते नाराज होते. तसंच, आगार प्रमुख व हेड मॅकेनिक यांनी नगरजी यांनी आठ दिवसांसाठी निलंबित केल्याने ते अस्वस्थ होते. 

नगारजी यांनी जिल्हा नियंत्रण अधिकाऱ्यांना एक निवेदन दिले होते. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, बदलीसाठी वारंवार अर्ज करण्यात आला होता. मात्र तो अर्ज आपल्याकडे पाठवण्यात आला नव्हता. तसंच, आगारातील वरिष्ठांकडून मानसिक,शारीरिक आणि आर्थिक त्रास देण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी पत्रात केला आहे. त्यानंतर त्यांनी कवठेमहाकाळ एसटी आगारात विष पिऊन आत्महत्या केली. जावेद नगरजी यांच्या पश्च्चात आई, पत्नी आणि दोन मुली आहेत.