नागपूर : एकीकडे राज्यात आरक्षणावरुन वाद सुरु असताना नागपूर खंडपीठाने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे. गोवारी समाजाचं गेल्या 23 वर्षांपासून हा लढा सुरु होता. खंडपीठाच्या या निर्णयामुळे गोवारी समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे.
विदर्भात गोवारी समाजाचं मुख्य वास्तव आहे. गायी राखणं हा गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. गोवारी समाजाच्या वतीने श्रीहरी अणे यांनी बाजू मांडली. गोवारी समाजाचा आता एसटी प्रवर्गात समावेश करण्यात येणार आहे.
शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये गोवारी समाजाला याचा मोठा फायदा होणार आहे. गोंड आणि गोवारी हे दोन वेगवेगळे समाज असल्याचं देखील हायकोर्टाने म्हटलं आहे. २३ नोव्हेंबर १९९४ ला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गोवारी समाजाने मोर्चा काढला होता. मोर्चादरम्यान चेंगराचेंगरीत ११४ जणांचा मृत्यू झाला होता तर 500 जण जखमी झाले होते.