माझ्या पप्पांचा पगार वाढवा, एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

 एका चिमुरडीने तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. 

Updated: Dec 14, 2019, 12:40 PM IST

जालना : लहान मुलांचं आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींकडे लक्ष असते. ते आपल्या घरातील मंडळी, आजुबाजूच्या व्यक्तींचे बारकाईने निरीक्षण करत असतात. कधीकधी लहान मुलांचा निरागसपण मोठ्या माणसांनाही विचार करायला भाग पडतो. एका चिमुरडीने तर थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. स्वत:ला खाऊ हवा किंवा कोणतं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नव्हे तर आपल्या बाबांचा पगार वाढवा अशी मागणी तिने पत्रात केली आहे. 

श्रेया हराळे ही चिमुरडी इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. आपल्या बाबांचा पगार वाढला आपल्याला चांगले शिक्षण मिळेल, सर्व इच्छा पूर्ण होतील याची तिला खात्री आहे. पगार कमी असल्यामुळे त्यांना ओव्हर टाईम करावा लागतो. त्यामुळे बाबांना तिच्यासाठी फार वेळ देता येत नाही. कामावरच जास्त वेळ जात असल्याने तिचे बाबा तिला शाळेत सोडायला येऊ शकत नाहीत. या सर्वाचा ती बालमनातून विचार करते. त्यामुळे त्यांचा पगार वाढावा अशी मनापासून तिची इच्छा आहे.

श्रेयाचे पत्र,

आदरणीय मुख्यमंत्री जी, माझे नाव श्रेया सचिन हराळे आहे.
मी मत्स्योदरी स्कूल अंबड येथे 1 ल्या वर्गात शिकते,
पत्रास कारण की, माझे पप्पा खूप दिवसापासून अंबड च्या बसमध्ये कंडक्टर चे काम करतात, माझे पप्पा सकाळी लवकर जातात आणि उशिरा येतात, मी त्यांना विचारले तर ते मला म्हणतात "सोनू बेटा ओव्हर टाईम करावा लागतो माझा पगार कमी आहे," म्हणून आदरणीय मुख्यमंत्री जी माझी विनंती आहे तुम्हाला माझा पपाचा पगार वाढवा ना, मग माझे पप्पा मला शाळेत सोडवायला येतील, आणि ओव्हर टायम करणार नाही,
माझे पप्पा खूप चांगले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून लालपरी आजारी पडलीय. त्यामुळे राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचे हाल सुरुयत. तुटपुंज्या पगारावरच एसटी कर्मचाऱ्यांच्या संसार कसाबसा सुरुय.हा संसार पुढे रेटण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करावा लागतो.

एसटी कर्मचाऱ्यांना कमी पगारामुळे मुक्कामाच्या ठिकाणी मिळेल त्या जागेवर जेवण करावं लागतं. असेल त्या जागेवर झोपावं लागतं.परिवहन विभागाकडून मिळणारा भत्ता तुटपुंजा असल्यानं हॉटेल मधला 5 रुपयांचा चहा देखील त्यांच्या पोटाला मिळत नाही. त्यामुळे आधीच्या जन्मात काय एवढं पाप केलं होतं ज्यामुळे एसटी कर्मचारी झालो असा प्रश्न लाखो एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात कायम जागा करून असतो.

यावेळी राज्यात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीच सरकार सत्तेवर आलंय.पण सरकार समोर आव्हानं मोठी हेत.यातलंच एक आव्हान म्हणजे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढवणे. आता श्रेयाच्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतात याकडे श्रेयाच लक्ष लागलंय ती मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची वाट पाहतेय.

या पत्राची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यामुळे संवेदनशील स्वभावाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनाचा ठाव या पत्राने नक्की घेतला असेल. एसटी सध्या तोट्यात असून कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. नवे सरकार या कर्मचाऱ्यांसाठी तारणहार ठरणार का ? असा प्रश्न या मुलीच्या पत्राच्या निमित्ताने उभा राहीला आहे. या चिमुरडीच्या पत्रावर शिवसेना नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी 'झी २४ तास'ला प्रतिक्रिया दिली आहे. या मुलीची मागणी प्रामाणिक असून नक्कीच याची दखल घेतली जाईल. एखाद्या आंदोलनाइतकंच या चिमुरडीचं पत्र आपली व्यथा पोहोचवत असल्याचे ते म्हणाले.