महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीसाठी यंदा तुम्हाला वाट पाहावी लागणार

हवामान बदलाचा फटका स्ट्रॉबेरी पिकालाही बसला आहे

Updated: Dec 14, 2019, 11:15 AM IST
महाबळेश्वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीसाठी यंदा तुम्हाला वाट पाहावी लागणार title=

तुषार तपासे, झी २४ तास, सातारा : महाबळेश्वर म्हंटलं की डोळ्यासमोर येते ती लाल रंगाची, थोडी आंबट चव असलेली स्ट्रॉबेरी. मात्र डिसेंबर उजाडला तरी अजून महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी बाजारात येऊ शकलेली नाही. महाबळेश्वर पाचगणी भागात दर वर्षी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं. या भागातल्या थंड हवामानामुळे या ठिकाणच्या स्ट्रॉबेरीची चव काही वेगळीच असते. मात्र या वर्षी लांबलेला पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे अजूनही स्ट्रॉबेरीचं पीक शेतकऱ्यांच्या हाताला आलेलं नाही. 

यावर्षीचं स्ट्रॉबेरीचं पीक हातात यायला जानेवारी किंवा फेब्रुवारी महिना उजाडू शकतो, स्ट्रॉबेरीचं पीक घेणाऱ्या दिलीप बावळेकर या स्थानिक शेतकऱ्याचं म्हणणं आहे.

तर, हवामान बदलाचा फटका स्ट्रॉबेरी पिकालाही बसला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनात यंदा घट होणार असल्याची चिंता तेजस बावळेकर या शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे. ढगाळ वातावरणामुळे स्ट्रॉबेरीची लावलेली रोपं खराब होताहेत, तर काही रोपांची वाढच झालेली नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

स्ट्रॉबेरीच्या एका रोपाची किंमत १० रुपयांच्यावर गेली आहे आणि उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारनं आमच्याकडेही लक्ष देण्याची मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.