मुंबई : कोर्टाने मनाई करूनही राज्यातील एसटी कर्मचा-यांनी माघार घेतलेली नाही. राज्यातल्या ५९ आगारांचं काम ठप्प आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीला २३ पैकी २२ कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
मात्र मनाई आदेश धुडकावत संप केल्यामुळे कोर्टाने गंभीर दखळ घेतली आहे. कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अजयकुमार गुजर यांना नोटीस बजावण्यात आली आहे. गुजर यांनी शुक्रवारी अडीच वाजता न्यायालयात हजर राहून प्रतिज्ञापत्र दाखल केले नाही तर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करा या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी-कामगारांचा राज्यात बेमुदत संप सुरू आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे विलीनीकरणाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने कर्मचारी संघर्ष करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
कोरोना संकटकाळात जनसेवेची सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच, 'एसटी महामंडळाला राज्य शासनात विलिन करा' ही एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे.