ST Workers Strike : कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य

एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत, तर एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे

Updated: Jan 11, 2022, 05:59 PM IST
ST Workers Strike : कारवाईच्या भीतीने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, गळफास घेत संपवलं आयुष्य title=

ST Workers Strike : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात गेल्या ७७ दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. एसटी महामंडळाने आवाहन केल्यानंतरही एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उचलला आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. तर अनेक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बाजवली आहे. 

कोल्हापूरमध्ये कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या एका कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धनाजी गारगोटी असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव असून ते गारगोटी आगारात कार्यरत होते. 

धनाजी वायदंडे यांना महामंडळाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कारवाईच्या भीतीने धनाजी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी आत्महत्येची ही दोन दिवसातली दुसरी घटना आहे.

शरद पवार यांनी केलं आवाहन
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य नाही. मात्र, काही जणांनी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये गैरसमज पसरविला. त्यांची दिशाभूल केली. त्यामुळेच हा संप चिघळला, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.

एसटी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. एसटी बंद ठेवून हा प्रश्न सुटणार नाही. एसटी रस्त्यावर धावली पाहिजे. दोन महिने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्याचाही विचार कर्मचाऱ्यांनी करायला हवा.

सरकार एसटी कर्मचाऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच नाही, असा गैरसमज काही जणांनी पसरवला. ज्यांना राजकारण करायचं, त्यांनी राजकारण करावं, परंतु, माझ्या दृष्टिने हा प्रश्न सुटणं जास्त महत्त्वाचं आहे. कामगारांची दिशाभूल केल्यामुळेच हा संप चिघळला, असे ते म्हणाले.