आशीष अम्बाडे, झी २४ तास, चंद्रपूर : कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्त भागासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. व्यापाऱ्यांना जीएसटी सादर करण्यासाठी महिन्याची मुदतवाढ, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य निर्धाराने मदत, वनमंत्रालयातर्फे शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी ८० टक्के अनुदान तसेच डॉ. मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत अनुदान रोजगार निधी दुप्पट करणार असल्याचे आश्वासन यावेळी मुनगंटीवार यांनी दिले.
राज्यातील कोल्हापूर-सांगली आणि लगतच्या जिल्ह्यात पावसाने थैमान घालून जनजीवन उध्वस्त केले आहे. या भागातील नागरिक आणि व्यापारी वर्गासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जीएसटी सादर करण्यासाठी महिन्याची मुदतवाढ देणार दिली जाणार असून या कालावधीत कोणताही दंड लावला जाणार नाही.
या भागातील नुकसानभरपाईसाठी राज्याने केंद्राकडे ६८१२ कोटी रु. मदतीपोटी मागितले आहेत. मात्र केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य या नागरिकांना निर्धाराने मदत करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे.
पूरग्रस्त भागात शेती उध्वस्त झाल्याने वनमंत्रालय शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी ८० टक्के अनुदान देणार असून मनरेगा च्या माध्यमातून देखील नंबू लागवडीसाठी अनुदान दिले जाणार आहे .
सह्याद्री सारख्या व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास असलेल्या गावाना प्रायोगिक तत्वावर १०० टक्के अनुदानावर कुंपण उपलब्ध करून दिले जाणार आहे याशिवाय पूरग्रस्त भागात रोजणार संधी निर्माण व्हावी यासाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेअंतर्गत रोजगार निधी दुप्पट केला जाणार आहे.