एसटीच्या आटमुठेपणामुळे विद्यार्थी शाळेविना

एसटीच्या आडमुठी धोरणामुळे संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीमधील विद्यार्थी घरीच राहावं लागतं आहे.दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या पण येडगेवाडीतील विध्यार्थ्यांना नेणारी एसटी बस अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देताच बंद करण्यात आली. त्यामुळे रोज विद्यार्थ्यी बस स्टॉपजवळ शाळेत जाण्यासाठी तयार होऊन येतात आणि एसटीची वाट बघून परत निघून जातात.

Updated: Nov 3, 2017, 02:45 PM IST
एसटीच्या आटमुठेपणामुळे विद्यार्थी शाळेविना title=

चिपळूण : एसटीच्या आडमुठी धोरणामुळे संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडीमधील विद्यार्थी घरीच राहावं लागतं आहे.दिवाळीची सुट्टी संपली आणि शाळा सुरू झाल्या पण येडगेवाडीतील विध्यार्थ्यांना नेणारी एसटी बस अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देताच बंद करण्यात आली. त्यामुळे रोज विद्यार्थ्यी बस स्टॉपजवळ शाळेत जाण्यासाठी तयार होऊन येतात आणि एसटीची वाट बघून परत निघून जातात.

दिवाळीच्या सुट्टीपूर्वी चिपळूण डेपोची चिपळूण-पाचांबे ही बस ९.३० वाजता येडगेवाडीत येत असे. मुलांना शाळेत सोडत असे. मात्र दिवाळीच्या सुट्टीत ही बस अचानकपणे बंद करण्यात आली. विशेष म्हणजे चिपळूण-पाचांबे बस ही घाडगेवाडीत रोज ९.१५ वाजेपर्यंत येते. पण तिथून पुढे ३ किलोमीटर पुढे असलेल्या येडगेवाडीत मात्र बस पाठवायला तयार नाही. मग याला आडमुठे धोरण म्हणावं नाहीतर काय म्हणावं. बसबाबत पालकांनी आरडाओरड केल्यानंतर देवरुख आगाराची मिडीबस येडगेवाडीत सकाळी ७.३० वाजता यायला लागली. तर परत फिरुन कुंभारखाणी माध्यमिक विद्यामंदीर येथे ही बस ८.३० वाजता पोहचते. शाळेची वेळ १०.३० आहे येडगेवाडीतील विद्यार्थ्यांना दोन तास आधी जावून शाळेत बसावे लागते. तर सकाळी लवकर घर सोडावे लागत असल्याने उपाशीपोटीच बाहेर पडावे लागत आहे. 

शाळेची जेवणाची वेळ दुपारी १.३० वाजता असल्याने सकाळापासून उपाशी असणा-या या चिमुकल्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत जेवण्याशिवाय अन्य वेळच मिळत नाही. एस.टी च्या आडमुठी धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेच शिवाय आरोग्य ही धोक्यात येवू लागले आहे. एस.टीच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून येडगेवाडीतील पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एस.टी च्या अधिका-यांना वारंवार विनंती करुन देखील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांचा निषेध करत आम्ही पाल्यांना शाळेतच पाठवणार नाही अशी भुमिका येडगेवाडीने घेतली आहे.