Bhushan Subhash Desai : माझ्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केला हे माझ्यासाठी... सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

Bhushan Subhash Desai : मुख्यमंत्री शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का. उद्धव ठाकरेंचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाईंचे पुत्र भूषण देसाईंचा शिंदे गटात प्रवेश. झी २४ तासच्या बातमीवर शिक्कामोर्तब. तर प्रवेश क्लेशदायक, सुभाष देसाईंची प्रतिक्रिया.

Updated: Mar 13, 2023, 08:30 PM IST
Bhushan Subhash Desai :  माझ्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केला हे माझ्यासाठी... सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया  title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :   झी 24 तासच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे सर्वात जुने निकटवर्तीय सुभाष देसाई ( Former minister Subhash Desai)  यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत बाळासाहेब भवनात हा प्रवेश सोहळा झाला. भूषण देसाई हे शिंदे गटात जाणार असल्याचं वृत्त सर्वात आधी झी २४ तासनं दिलं होतं. एवढंच नव्हे तर आजच त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचंही सांगितलं होतं. ही बातमी तंतोतंत खरी ठरली आहे. यावर आता सुभाष देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले सुभाष देसाई...

माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या  कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय  बाळासाहेब, उद्धवसाहेब आणि मातोश्री सोबत मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. 

वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र, इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव  परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे  कार्य सुरु ठेवणार आहे असे सुभाष देसाई यांनी म्हंटले आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुभाष देसाई यांनी आपली प्रतिक्रिया जाहीर केली आहे.  

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

भूषण देसाईंचा शिवसेनेशी काही संबंध नाही, वॉशिंग मशीनमध्ये कुणाला जायचं असेल तर जावं, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिलीय. तर आदित्य ठाकरेंसाठी मी खुप लहान आहे. मी काय कामं केली, तुम्ही माहिती घ्या. असं प्रत्युत्तर भूषण देसाईंनी दिले आहे. 

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सुभाष देसाईंनाही पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिले आहे. खरं पुत्रप्रेम असेल तर सुभाष देसाईही सोबत येतील, असं गोगावले म्हणाले. तर, चुकीचं काम केल्यानं भूषण देसाई शिंदे गटात गेले असतील. त्यामुळं शिवसेनेवर फरक पडत नाही, असं ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.