असा नेता हवा; त्या मुलींसाठी नाना पटोलेंनी सोडलं हेलिकॉप्टर...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांवर बोलताना, टीका करताना जितके आक्रमक आणि कठोर दिसतात तितकेच ते मृदू स्वभावाचे आणि हळवे असल्याचे त्यांच्या काही कृतीतून वारंवार दिसून येते.

Updated: Mar 13, 2022, 07:32 PM IST
असा नेता हवा; त्या मुलींसाठी नाना पटोलेंनी सोडलं हेलिकॉप्टर... title=

सोलापूर : काही दिवसांपूर्वी नागपूर येथे जात असताना महामार्गावर झालेल्या एक अपघातग्रस्त तरुणाला आपल्या गाडीत बसवून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्या या कृतीतून माणुसकीच दर्शन झालं होतं. 

त्यानंतर आज पुन्हा नाना पटोले यांनी आपल्यात सामाजिक जाणीव अजूनही जागे असल्याचं दाखवून दिलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे हेलिकॉप्टरने सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील एका कार्यक्रमासाठी ते उपस्थित रहाणार होते.

आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यालयात ते आले. सोलापुरातील उंजल तुकाराम दासी या 5 वर्षीय मुलीला हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीने मुंबईला जायचे होते. त्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबियांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यालयात धाव घेतली होती.

 

तेथे उपस्थित असलेल्या नाना पटोले यांनी त्या लहानग्या मुलींसाठी तत्काळ आपले हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. नानांनी आपल्या हेलिकॉप्टरमध्ये उंजल हिच्यासह तिच्या कुटुंबियांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं आणि हेलिकॉप्टर तत्काळ आकाशात झेपावलं.

उंजल आणि तिच्या कुटुंबियांना हेलिकॉप्टर दिल्यानंतर  नाना पटोले यांनी संध्याकाळी सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर येथे आयोजित कार्यक्रमात नाना पटोले यांच्या या कृतीचे कौतुक केले.