Summer Special Trains in Marathi : उन्हाळ्याच्या सुट्टीत बरेच लोक आपल्या कुटुंबासह आणि मित्रापरिवारासहा बाहेरगावी जात असतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने 258 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली होती. त्यामुळे आता उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या 290 वर पोहोचली आहे. यामध्ये 16 वातनुकूलित साप्ताहिक फेऱ्यांचा देखील समावेश असणार आहे. जाणून घ्या उन्हाळी विशेष गाड्यांचे वेळापत्रक...
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01187 वातानुकूलित साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी 18 एप्रिलपासून ते 6 जूनपर्यंत दर गुरुवारी रात्री 10.15 वाजता एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिविम येथे पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक 01188 वातानुकूलित साप्ताहिक स्पेशल थिवी येथून 19 एप्रिल 2024 ते 7 जून 2024 दरम्यान शुक्रवारी दुपारी 4.35 वाजता धावेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01129 सेकंड सिटिंग स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 20 एप्रिल 2024 ते 8 जून 2024 दरम्यान शनिवारी रात्री 10.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिवी येथे पोहोचते. तेच परतीच्या प्रवासासाठी थिवी येथून 01130 सेकंड सीटिंग स्पेशल ट्रेन 21 एप्रिल 2024 ते 9 जून 2024 दरम्यान रविवारी दुपारी 4.35 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईला पोहोचेल.
या उन्हाळी विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवी दरम्यान 32 अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचे आरक्षण आजपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू करण्यात आले आहे.