कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : सत्ता गेली तरी पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवार हे समीकरण कायम आहे. पण, हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने झालेल्या जाहीर सभेत अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात बाजी मारली ती सुप्रिया सुळे यांनी... पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट
राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये ही सभेचे आयोजन करण्यात आलं. कधी काळी अजित पवार यांचे समर्थक आणि अजित पवार यांना महापालिकेतून हद्दपार करणाऱ्या आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांच्या बंडखोरीची आणि अजित पवार यांच्या महापालिकेतल्या पराभवाची किनार या सभेला होती.
नेमके याचेच भान असलेल्या जयंत पाटील यांनी लांडगे आणि जगताप यांचे नाव न घेता त्यांच्यावत जहरी टीका केली खरी पण उपरोधिक पणाने का होईना त्यांना पक्षात परत येण्याची संधी असल्याचे सूचित केले.
पण जयंत पाटलांचा हाच मुद्दा खोडत सुप्रिया सुळे यांनी मात्र गद्दारांची पक्षाला गरज नाही हे तर सांगितलंच पण ज्यांनी शरद पवार यांची साथ सोडली ते कुठे आहेत?, त्यांचा इतिहास तपासा अश्या शब्दात विरोधकांना इशारा दिला. पडत्या काळात अजित पवारांना साथ दिलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरत सुप्रिया सुळेंनी ही सभा जिंकली.
सुप्रिया सुळे यांच्या नंतर धनंजय मुंडे यांनी ही राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर तोंड सुख घेत त्यांच्यावर टीका केली.
एकिकडे इतर नेते टीका करत असताना पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी मात्र, सोडून गेलेल्या नेत्यांवर थेट बोलण्याचे टाळत अनेक शंकांना वाव दिला. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी या नेत्यांवर केले खरे पण त्यात म्हणावा असा दम नव्हता. म्हणूनच शहरात बंड केलेले नेते परतीच्या प्रवासाला तर लागणार नाहीत ना? असा सवाल अनेकांना सतावू लागलाय..!