हिंगोली : हिंगोली शहरातील नाईक नगरमध्ये असलेल्या बजाज अलायन्सच्या कार्यालयातील खुर्च्याची तोडफोड करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ही तोडफोड करण्यात आली आहे. यंदा परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे खरीपातील सोयाबीन कापूस तूर ज्वारी या पिकांना विमा मिळणं आवश्यक होतं.
यंदा हिंगोली जिल्ह्याची केवळ 43 टक्के एवढीच आणेवारी निघाली आहे. तरी देखील हिंगोली जिल्ह्यात पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तोडफोड केली.
अल्प लागवड क्षेत्र असलेल्या फळबागेला मात्र विमा संरक्षण देण्यात आलं आहे. पण सर्वाधिक क्षेत्र असलेल्या खरिपातील पिकांना पिक विमा संरक्षण मिळालं नाही. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अडकीने यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं. तात्काळ जिल्ह्याला खरीपाचा विमा देण्यात यावा, अशी मागणी ही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.