Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करु शकतात. महाराष्ट्रातही निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर, एकीकडे राजकारणात अजित पवार आणि शरद पवार यांच्या संघर्षाची चर्चा असतानाच महाराष्ट्रात आणखी एका काका-पुतण्याचा संघर्ष समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत पुतण्याच काकाच्या विरोधात शड्डू ठोकणार आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांचा पुतण्या स्वरुप जानकर यांनी दंड थोपाटला आहे. स्वरूप जानकर यांचे महादेव जानकरांना खुले पत्र लिहित आव्हान दिलं आहे. तसंच, मीदेखील राजकारणात उतरणार, असा इशाराच स्वरुप यांनी दिला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात पुतण्या विरुद्ध काका असा लढा पाहायला मिळणार आहे.
महादेव जानकर यांनी त्यांचे पुतणे स्वरुप राजकारणात उतरणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. मात्र स्वरुप यांनी काकांच्या या म्हणण्याला असहमती दर्शवत राजकारणात उतरण्याचा इच्छा बोलून दाखवली आहे. स्वरुप यांनी थेट पत्र लिहितच त्यांची भूमिका मांडली आहे.
स्वरुप जानकर यांनी महादेव जानकरांना उद्देशून एक पोस्ट लिहली आहे. त्यात त्यांनी नमूद केलं आहे की, तुमची भूमिका मला मान्य नाही, मी देखील राजकारणात येणार. तुम्ही मला आता राजकीय भूमिकेपासून रोखू शकणार नाहीत. तसंच, त्यांनी माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.
'साहेब तुमच्यामुळे जानकर आडनाव मोठं झालं आहे, त्यासाठी आपण अपिरिमित कष्ट घेतले आहेत. घर संसाराचा त्याग करून देहाचा अग्निकुंड केलात. कॅबिनेट मंत्री होऊनही तुमचा संघर्ष कायम आहे. या वाटचालीत तुमच्या कुटुंबियांनीही संघर्ष केला आहे, हे सांगण्याची वेळ आता आली आहे. त्यापाठीमागे तुमचा आदर्शवादी राजकारणाचा विचार असला तरी तुम्ही स्वत:चे भाऊ, बहिण सोडून राजकीय नेत्यांमध्ये भाऊ-बहिण शोधायला लागलात आणि त्यातून हाती काय लागलं हे जगजाहीर आहे. तुम्ही कधीही कुटुंबातील व्यक्तीशी चर्चा करून राजकीय निर्णय घेतले नाहीत.'
'आज परभणीच्या सभेत बोलताना तुम्ही माझा पुतण्या राजकारणात येणार नाही, असं सांगितलं. अशी वक्तव्य तुम्ही अधूनमधून करत असता. त्यातून तुमची प्रतिमा मोठी होते. मात्र कुटुंबाचं खच्चीकरण होतं असतं. गेल्या आठ दहा वर्षात राजकीय कारस्थानांचा अनुभव आलेला असताना तुम्हाला कुटुंब संस्थेचं महत्त्व अजून समजलं नाही, हे आमचं दुर्दैव आहे.'
'तुमच्या राजकारणासाठी कुटुंबाशी संबंध ठेवू नका, पण तुमची मतं लादू नका, ही नम्र विनंती आहे. तुमचा एकमेव पुतण्या म्हणून सांगतो की मला तुमची भूमिका मान्य नाही. कारण मला राजकारणात काम करायचं आहे. मलाही राजकीय विचार आहे आणि त्याप्रमाणे काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे मी राजकारणात येऊ शकतो आणि प्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवूही शकतो. तुम्हाला मदत हवी असेल तर तीही करीन, पण राजकीय भूमिकेपासून मला रोखता येणार नाही.'