अंबरनाथ येथे गाडी थांबविल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार

 गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. 

Updated: Oct 24, 2020, 09:58 PM IST
अंबरनाथ येथे गाडी थांबविल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार

अंबरनाथ : गाडी अडवल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्याच्या बाहेर हा प्रकार घडला. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या.

बाळू चव्हाण असं या घटनेत जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून ते उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. चव्हाण हे शुक्रवारी रात्री ड्युटी संपवून उल्हासनगरहून बदलापूरला आपल्या घरी जायला निघाले होते. त्यावेळी अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली असताना एका कारमध्ये चार रेकॉर्डवरील गुन्हेगार रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेले त्यांना आढळले. त्यामुळे त्यांनी या चौघांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता या चौघांनी गाडीतून उतरून त्यांच्या डोक्यात तलवारीने वार केले. 

यानंतर कारच्या मागे असलेल्या एका रिक्षाचालकाला तलवारीचा धाक दाखवत त्याची रिक्षा घेऊन हे चौघे पसार झाले. या आरोपींनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गाडी फोडली. तिथून एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या कार्यालयावर त्यांनी हल्ला केला. तिथून उल्हासनगरच्या शिवाजी चौकात एक लाल रंगाच्या आय ट्वेन्टी गाडीची काच फोडत चालकाचं अपहरण करून ते अंबरनाथला आले. आणि त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचारी बाळू चव्हाण यांच्यावर हल्ला केला. 

या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपींना पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासाच्या आत उल्हासनगरमधून बेड्या ठोकल्या. या आरोपींवर आत्तापर्यंत आतापर्यंत सहा ते सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे.