कोरोना : कशी घ्याल काळजी?, दीपक म्हैसकर यांनी दिली 'ही' माहिती !

 कोरोना व्हायरसपासून कशी घ्याल काळजी?

Updated: Mar 10, 2020, 02:16 PM IST
कोरोना : कशी घ्याल काळजी?, दीपक म्हैसकर यांनी दिली 'ही' माहिती ! title=

पुणे : कोरोना विषाणूबाधीत रुग्णाची ओळख देऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. दुबईहून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला फिरायला गेले होते. एकूण ४० प्रवाशी होते, त्यांची यादी मिळाली आहे. त्यांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, अशा माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली. दरम्यान, कोरोनापासून कशी काळजी घ्यावी, याचीही माहिती यावेळी म्हैसकर यांनी दिली.

कोरोना व्हायसर रोखण्यासाठी?

- गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शक्यतो अशी ठिकाणे टाळावीत.
- हात वेळोवेळी धुवा. हात साबणाने किमान २० सेकंद धुवावेत. बोटांचा अग्र भाग आणि पूर्ण हात धुतला पाहिजे
- बाहेरुन घरात येताना प्रथम हात स्वच्छ धुवून घ्यावेत. नंतर घरात वावर करावा.
-  शक्यतो डोळे,  नाक, तोंडला हाताने संपर्क करणे टाळावे.

दरम्यान, 'कोरोना'साठी अँटी व्हायरल औषध आणि लस उपलब्ध नाही. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन 'झी २४ तास'च्या माध्यमातून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

कोरोनाचे दोन्ही रुग्ण नायडू हॉस्पिटल येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तर दुसऱ्या रुग्णांमध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाही. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी सांगितले.

१५ दिवसांत कोठे केला प्रवास?

दरम्यान, दोन रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांनी यापूर्वीच्या पंधरा दिवसाचे कालावधीमध्ये कोणत्या ठिकाणी प्रवास केला त्याची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्ती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुबई येथे ४० जणांचे ग्रुप सोबत फिरायला गेले होते आणि ते एक मार्च रोजी भारतामध्ये परत आलेले आहे. या दोन व्यक्ती पैकी एका व्यक्तीला त्रास झाल्यामुळे त्यांनी दिनांक ८ मार्च रोजी डॉक्टरांकडून आपली तपासणी करून घेतली. त्यावेळी त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे. दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांचे यादीमध्ये नसल्यामुळे संशयित रुग्ण १ मार्चला भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही.

 या दोन्ही व्यक्तीच्या भारतात परत आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे या दोन्ही रूग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांचे कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी-कर्मचारी यांचा त्यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यत रूग्णांच्या कुंटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविणेत आले आहे, असे म्हैसकर यांनी सांगितले.