Government Jobs: तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा

Maharashtra Government Jobs: महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 19, 2023, 03:38 PM IST
Government Jobs: तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा title=

Maharashtra Talathi Bharti Application Date: तलाठी भरती परीक्षेला राज्यातील तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. याआधी अनेक तरुण आजही अर्ज करत आहेत. दरम्यान परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. 

तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याची घोषणा  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानपरीषदेत केली. यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जुलै होती. या प्रक्रियेत  उमेदवारांना अर्ज करणे आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी एक दिवसाची मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे.

तलाठी पदासाठी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. या अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे पण नेमकी किती तारखेपर्यंत ही मुदतवाढ असेल हे स्पष्ट करण्यात आले नाही. यासंदर्भात  लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आले आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेची पुन्हा एकदा मुदत वाढविण्याची विनंती महसुल मंत्र्यांनी केली होती. त्यानुसार याला मुदतवाढ देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्रातील सहा विभागाअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील चार हजार ६४४ पदांच्या भरती केली जाणार आहे. यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, तसेच अमरावती या विभागांचा समावेश आहे.  सर्व जिल्ह्यातील तलाठ्यांची चार हजार ६४४ पदे भरली जातील. 

एकच प्रश्नपत्रिका 

महत्वाची अपडेट म्हणजे तलाठी भरती परीक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका नसेल. राज्यातील सर्व जिल्हातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

टीसीएसकडून होणार परीक्षा 

परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरव्यवहाराची मागील उदाहरणे पाहता महाराष्ट्र शासनाने महत्वाची पावले उचलली आहेत. त्यामुळे तलाठी भरती परीक्षा टीसीएस कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी टीसीएस कंपनीकडून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दोन तारखांचे पर्याय दिले आहेत. 

उमेदवारांचा प्रतिसाद

राज्यातील लाखो तरुण तलाठी भरती परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यामुळे या परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे. सुमारे पाच लाख उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

एकाच जिल्ह्यातून अर्ज

तलाठी भरती परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील याची नोंद घ्या.

अर्ज शुल्क 

तलाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या साधारण गटातील उमेदवारांना एक हजार, तर आरक्षित गटातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.