पात्र नसतानाही तन्मय फडणवीसने घेतली लस, देवेंद्र म्हणतात...

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण 

Updated: Apr 20, 2021, 02:51 PM IST
पात्र नसतानाही तन्मय फडणवीसने घेतली लस, देवेंद्र म्हणतात... title=

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा पुतण्या तन्मय फडणवीस (Tanmay Fadanvis) याने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतला. याचा फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यानंतर वादाला सुरुवात झाली. तन्मयला 45 वर्षे पूर्ण आहेत का ? तो फ्रंट लाईन वर्कर आहे का ? तो आरोग्य कर्मचारी आहे का ? असा प्रश्न यानिमित्ताने सोशल मीडियावरील युजर्स आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उपस्थित केलाय. या वादानंतर तन्मयने ही पोस्ट डिलीट केली. 

केंद्रातर्फे 18 वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. तन्मय जेव्हा पहिला आणि दुसरा डोस घेतला तेव्हा हा नियम नव्हता. तो कोणत्याही निकषांमध्ये बसत नव्हता. त्याने इंस्टाग्रामवरुन फोटो शेअर करत आपण लस घेतल्याचे सांगितले. त्यानंतर या पोस्टवर टीका सुरु झाली.

एनआयसीचे स्पष्टीकरण 

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने स्पष्टीकरण देत याप्रकरणातून हात झटकले आहेत. तन्मय फडणवीस याने लसीचा पहिला डोस  मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात घेतला होता. त्याचे प्रमाणपत्र आम्हाला दाखवल्यानंतर आमच्या सेंटरमध्ये त्याला दुसरा डोस दिला गेला असे  संचालक शैलेश जोगळेकर यांनी सांगितले. त्याला कोणत्या निकषावर पहिला डोस दिला हे माहित नसल्याचे सांगत त्यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयाकडे बोट दाखवले. 

काय म्हणाले फडणवीस ? 

'तन्मय फडणवीस हा माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्यावर आक्षेप नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केलं. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत असल्याचे फडणवीस म्हणाले.