पुणे : पुण्यात आढळलेल्या कोरोनाच्या दोन्ही रुग्णांवर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरूय. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिलीय. या दोघांना मुंबईतून पुण्यात आणलेल्या टॅक्सी ड्रायव्हलादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालंय.
या रुग्णांची ओळख उघड न करण्याचं आवाहन पुण्यातल्या विभागीय आयुक्तांनी नागरिकांना केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेतली जातेय असं त्यांनी सांगितलंय. हे दोन्ही रुग्ण फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुबईला फिरायला गेले होते.
त्यावेळी कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जातेय. तसंच दोघांच्या कुटुंबातील ३ जणांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवलेत. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांनीही काळजी घेण्याचं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलंय.
दोन्ही रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी झी २४ तासला दिली आहे. नायडू हॉस्पिटलमध्ये 6 बेड्सचा स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलाय. शिवाय 10 खाजगी रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीय.
दोन्ही रुग्ण दुबईहून आले होते. दुबईत ते पर्यटनासाठी गेले होते. महाराष्ट्रातील ४० जण त्यामध्ये होते. आता त्या सर्व लोकांचा शोध घेतला जातोय.