कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : वंशाला दिवा हवा, म्हणून पिंपरी चिंचवडजवळ सांगवी परिसरातल्या एका 45 वर्षाच्या शिक्षकाने एका 19 वर्षाच्या मुलीशी विवाह केला. मात्र या मुलीने धाडसाने नवऱ्याच्या तावडीतून पळ काढला, आणि या शिक्षकासह स्वतःच्या पालकांवर गुन्हा दाखल केला आहे. सुटकेसाठी आर्त हाक देणारी ही मुलगी आहे, पिंपरी चिंचवडच्या सांगवी परिसरातली. विठ्ठल उत्तमराव काळे या 45 वर्षीय शिक्षकाशी 30 मार्च 2018 ला, तिचं तिच्या पालकांनी पैशांसाठी जबरदस्तीने लग्न लावलं होतं. आई वडिलांवर 6 ते 7 लाख रुपयांचे कर्ज होतं, ते फेडण्याचं आश्वासन या भामट्या शिक्षकाने दिलं.
विशेष म्हणजे या भामट्याचं आधी एक लग्न झालंय. त्याला एक 15 वर्षांच्या मुलगीही आहे. पहिल्या पत्नीला मुलगा झाला नाही म्हणून या इसमाने हे दुसरं लग्न केलं. अखेर या मुलीने या भामट्याच्या तावडीतून सुटका करत पोलिसांत तक्रार दाखल केली.
आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशा पैशांचं आमीष दाखवून विठ्ठल काळेने शिक्षकी पेशाला काळीमा फासलाय. या मुलीच्या आईवडिलांनी पैशांसाठी मुलगी म्हाताऱ्याला विकून आपल्या नात्याला काळीमा फासलाय. पोलिसांनी विठ्ठल काळेला बेड्या ठोकल्यात.
मुलीचे आईवडीलही तुरूंगाची हवा खातायत. या मुलीने परिस्थितीशी दोन हात करत स्वतः सूटका करून घेतलीय त्याबद्दल तिचं कौतुकच. मात्र असले प्रकार करणारे असे अनेक विठ्ठल काळे समाजात आहेत. मुलींना पैशांसाठी विकणारे अनेक नराधम पालकही समाजात आहेत. या घाणेरड्या प्रवृत्ती वेळीच रोखणं गरजेचं आहे.