पुणे : TET परीक्षा घोटाळ्यासंदर्भात मोठी बातमी. TET परीक्षा घोटाळ्यातील आरोपी तुकाराम सुपेच्या (Tukaram Supe) घरावर पोलिसांनी आज पुन्हा धाड टाकली. पुणे पोलिसांना (Pune Police) सुपेच्या घरात कोट्यवधी रुपये आणि सोनं सापडलं आहे. या आधाही सुपेच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली होती तेव्हा त्याच्या घरातून 88 लाख रुपये जप्त करण्यात आले होते.
आज टाकलेल्या धाडीत पोलिसांच्या हाती तब्बल 2 कोटी रुपये आणि सोनं सापडलं आहे. धाड टाकण्यापूर्वीच सुपेची पत्नी आणि त्याच्या मेहुण्यानं घरातील रक्कम दुसरीकडे ठेवली होती. मात्र पोलिसांनी कसुन तपास केल्यानंतर त्याच्या घरातून कोट्यवधींचं घबाड सापडलं आहे.
टीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण वाढवून देण्यासाठी तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघाना 4 कोटीहून अधिक रुपये मिळाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. त्यापैकी 1 कोटी 70 लाख रुपये सुपेला मिळाले होते.
कुंपणच शेत खात होतं
टीईटी घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या तुकाराम सुपे याला दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी अटक केली होती. सुपे यांनी टीईटी परीक्षेत अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केलं असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
असा होत होता घोटाळा
शिक्षक भरती परीक्षा झाल्यानंतर रिचेंकिगवेळी गैरप्रकार होत होता. ज्या विध्यार्थ्यांकडून पैसे घेतले जात होते, त्यांना पेपर रिचेकिंगला द्या असं सांगितलं जात होतं. यासाठी उमेदवाराकडून 35 हजार ते 1 लाख रुपये घेतले जात होते. आतापर्यंत जवळपास साडेचार कोटी जमा झाले आहेत, असा प्राथमिक अंदाज असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
पैसे आपापसात वाटून घेतले
जानेवारी 2020 मध्ये टीईटीची परीक्षा झाली होती. एजंटच्या मदतीने परीक्षेतील परिक्षार्थींची माहिती मिळवून त्या परीक्षार्थींना पात्र करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी 50 हजार ते 1 लाखांपर्यंत रकमा स्विकारली जात होती. साधारण 4 कोटी 20 लाख रूपये जमा करुन ते आपापसांत वाटून घेतले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेत पात्र केलं. यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रीतिश देशमुख 1.25 कोटी आणि अभिषेक सावरीकर यास 1.25 कोटी रुपये घेतल्याचे चौकशीत कबूल केलं आहे.