1.40 कोटींचा गंडा, बनावट कंपनीच्या माध्यमातून फसविणाऱ्या टोळीला अटक

बनावट कंपन्या बनवून गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

Updated: Apr 4, 2019, 07:51 PM IST
1.40 कोटींचा गंडा, बनावट कंपनीच्या माध्यमातून फसविणाऱ्या टोळीला अटक title=
संग्रहित छाया

ठाणे : बनावट कंपन्या बनवून गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत नऊ गुंतवणूकदारांची तब्बल 1 कोटी 40 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केली. हे पोलीस तपासातून उघड झाले आहे. तर फसवणूक झालेल्यांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली. या टोळीने रेडरॉकगेम, टिप्सझोन अॅडवायझरी प्रा. लि., किप्टो ट्रेड डब्ल्यूएस आणि जीआ कुल आदी बनावट कंपन्या काढून त्याद्वारे ही फसवणूक करण्यात येत होती. बनावट कंपनी स्थापन करणारी ही टोळी अनेक गुंतवणुकदारांना कमी कालावधीत जास्त पैसे परत देण्याचे आमिष दाखवत होती. गुंतवणूक केलेल्या पैशावर दर दिवशी एक टक्का व्याज देण्याचे आश्वासन ही टोळी देत असत. तर जो व्यक्ती या कंपनीत गुंतवणूकदार घेऊन येईल त्यांना देखील या टोळीने दर आठवड्याला तीन टक्के रॉयल्टी देण्याचे आमिष दाखविले. या टोळीच्या भूलथापांना भुलून अनेक गुंतवणूकदारांना आपले पैसे या कंपन्यांमध्ये गुंतवले होते. 

लोकांना आमिष दाखवून काही पैसे दिले नाही. गुंतवलेल्या पैशावरही व्याज न देता लोकांनी गुंतवलेले पैसे देखील हडपले. या टोळीकडून फसवणूक झालेल्या एका व्यक्तीने या प्रकरणी कापूरबावडी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. गुन्हे शाखेच्या तपासात या टोळीने एकूण नऊ गुंतवणूकदारांची तब्बल 1 कोटी 40 लाख 27 हजाराची फसवणूक केल्याचे उघड झाले. 

बनावट कंपन्या स्थापन करून फसवणारी टोळी फरार झाल्याचे देखील समोर आले. त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून दिल्ली आणि गुजरात येथून या टोळीतील प्रकाश गोविंद मोरे ( 52, महावीर हाईट्स नंबर 2, खडकपाडा, कल्याण), संदीप गोविंद पाटील (42, वाघबिल नाका, घोडबंदर रोड ठाणे), उमंग कणकभाई शाह (27, सुरत, गुजरात), अजय महेशचंद्र जरीवाला (43, उदना, सुरत,गुजरात) आणि रितेश सुरेशचंद्र पटेल (35, वलसाड, गुजरात) या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली. या टोळीत कोण सहभागी आहेत, किती जणांची टोळी आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी दिली.