Thane Gangwar : ठाण्यात गँगवॉरच्या दोन घटना घडल्या असून दिवसाढवळ्या गोळीबार दोन घटनांनी ठाणे हादरलं आहे. गोळीबाराच्या या दोन घटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यातल्या येऊर परिसरात गोळीबाराची पहिली घटना घडली त्याआधी सकाळी नौपाडा परिसरात गोळीबार झाला.
येऊर परिसरात गोळीबार
ठाण्यात वर्तकनगर (Thane Vartak Nagar) परिसरातल्या येऊर (Yeoor) जंगलात गण्या काळ्या नावाच्या गुंडावर गोळीबार झाला. गँगवॉरमुळे हा गोळीबार झाला असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गोळीबार करून अज्ञात व्यक्ती पळून गेले. गण्या काळ्या हा गुंड जखमी झालाय. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गण्या काळ्या याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. हत्येच्या प्रयत्नात तो जेलमध्ये होता, आणि नुकताच जामीनावर बाहेर आला होता.
नौपाडा भागात गोळीबार
त्याआधी नौपाडा (Naupada) भागातील घंटाळे परिसरात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. हा दोन गटांमधील वाद असण्याची शक्यता आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समजत आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, त्याच्यासोबत त्याचे सहकारीदेखील होते. आपल्या कार्यालयातून ते रात्रीच्या वेळी कंदील पुरवण्याचं काम करत होते. त्याचवेळी हल्लेखोर तिथे पोहोचले आणि गोळीबार केला. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घंटाळी परिसर हा नौपाडा या मध्यवर्ती भागामधील गजबजलेल्या भागांपैकी एक आहे. याच रस्त्यापासून हाकेच्या अंतरावर राम मारुती रोड आहे. या भागामध्ये सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. घंटाळी मंदिराच्या मागील बाजूस शाळा असून काही अंतरावरच नौपाडा पोलीस स्थानक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आहेत.