ठाण्यात छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स, गुन्हा दाखल

ठाणे शहरात छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावणाऱ्या तीन अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल

Updated: Jan 13, 2020, 07:38 AM IST
ठाण्यात छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स, गुन्हा दाखल  title=

मुंबई : ठाणे शहरात छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावणाऱ्या तीन अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. बॅनरवर संगीता शिंदे, राजा गोळे आणि अॅडव्होकेट हेमचंद्र मोरे यांची नावं छापण्यात आली होती. तसंच सीआर सामाजिक संस्थेचं नावही शुभेच्छूक म्हणून होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कळवा पोलीस आणि नौपाडा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोस्टरवर शुभेच्छा देणाऱ्यांपैकी अजून कोणाला अटक झालेली नाही. महापालिकेने हे पोस्टर लावण्यास कोणतीही परवानगी दिली नव्हती असंही आता उघड झालंय. त्यामुळे पोलिसांनी ही वादग्रस्त पोस्टर्स काढून टाकली.

ठाण्यात काल कळवा आणि नौपाड्यात बसस्टॉपवर अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनला शुभेच्छा देणारी पोस्टर्स लागली होती. 

त्यानंतर एकच खळबळ माजली होती. चार वर्षांपूर्वी भारताने मलेशियातून छोटा राजनला ताब्यात घेत तिहार तुरूंगात ठेवलंय. सध्या तो पत्रकार जे.डे हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय.

छोटा राजन दोषी 

२०१२ मध्ये हॉटेल व्यावसायिक बी. आर. शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने १३३२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न आणि शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न असा आरोप ठेवण्यात आला होता.

त्यासाठी छोटा राजनविरोधात खटल्यांसाठी विशेष न्यायालया स्थापन केले होते. या विशेष न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.बी. आर. शेट्टी खंडणी आणि गोळीबार प्रकरणी त्याच्यासह ६ जणांना शिक्षा दिली गेली आहे.

मुंबईतल्या विशेष मोक्का न्यायालयाने आज या प्रकरणी निर्णय दिला. २०१५मध्ये प्रत्यार्पण झाल्यानंतर राजनला झालेली ही दुसरी शिक्षा आहे.