आरोपीने एका दिवशी पाच महिलांची... मुंबई लोकल अत्याचार प्रकरणात धक्कादायक अपडेट

मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी जेव्हा महिलांची छेड काढत होता तेव्हा कुणीच त्याला का रोखले नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपी हा विकृत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.  

Updated: Jun 16, 2023, 04:36 PM IST
आरोपीने एका दिवशी पाच महिलांची... मुंबई लोकल अत्याचार प्रकरणात धक्कादायक अपडेट title=

Mumbai Local Train Sexual Harassment :  मुंबईत धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरमात अटक झालेल्या आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केला त्याच दिवशी त्याने आणखी पाच महिलांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याचे हे धक्कादायक कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे. पोलिस तपासादरम्यार आरोपीचे भयानक कृत्य उघड झाले आहे.  

धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याने खळबळ

धावत्या लोकलमध्ये विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. परीक्षेला जाणा-या एका 20 वर्षीय युवतीवर हा लैंगिक अत्याचार झाला आहे. 14 जून रोजी सकाळी 7.28 वाजता ही विद्यार्थिनी सीएसएमटी पनवेल या लोकलच्या सेकंड क्लास डब्यात चढली. सीएसएमटी स्थानकातून या तरुणीने लोकल पकडली होती. ट्रेन सुरू होताच आरोपी या डब्यात चढला आणि त्याने या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू केला. विद्यार्थिनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. एका वृद्ध महिलेने बचावासाठी पुढे येत पोलिसांना फोन करण्याचा इशारा दिला. मात्र आरोपीने त्यालाही दाद दिली नाही. मशीद बंदर स्टेशन येतात विद्यार्थिनीने ट्रेनमधून खाली उतरत स्वतःची सुटका करून घेतली. जीआरपी आणि आरपीएफच्या संयुक्त पथकाने आरोपी करीम नवाजला 8 तासांत अटक केली. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने एकाच दिवशी पाच महिलाची छेड काढली

आरोपी करीम नवाजला अटक केल्यानंतर पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील CCTV फुटेज देखील तपासले. या CCTV फुटेजमध्ये आरोपी करीम नवाजचे धक्कादायक कृत्य कैद झाले आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आरोपी जळपास 5 महिलांची छेड काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे CCTV फुटेजमध्ये मध्ये दिसत आहे. रेल्वे स्थानकांवर थांबलेल्या महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे या CCTV फुटेजमध्ये दिसत आहे. महिला या विरोध करत आहेत. मात्र, रेल्वे स्थानकातील इतर प्रवाशांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही व्हिडिओत दिसत आहे. 
रेल्वे स्टेशनवर महिलांची छेड काढली जात असताना कुणीच या नराधमाला का रोखले नाही याबबात देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिस आरोपीचा तपास करत आहेत. आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे समजते. मात्र, या सर्व प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील उपस्थित झाला आहे.