विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : महाराष्ट्रातल्या पाच शहरांमधली हवा अतिशय प्रदुषित असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या अहवालात मुंबईतलं तारापूर हे सर्वाधिक प्रदुषित असल्याचं समोर आलं आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केलेल्या अभ्यासात राज्यातील ५ शहरांमध्ये प्रदूषणाचा उद्रेक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हवेत असलेल्या धुलीकणांच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आलेत. हवा प्रदूषणाचा गुणवत्ता निर्दैशांक सरासरी ५० ते ६० मायक्रोग्रॅम पर क्युबीक मीटर मानला जातो. मात्र महाराष्ट्रातील ५ शहरांची आकडेवारी धोकादायक आहे.
तारापूरने ९३.६९ ची पातळी गाठली आहे. त्याखालोखाल चंद्रपूर ७६.४१, औरंगाबाद ६९.८५, डोंबिवली ६९.६७ तर नाशिकमध्ये ६९.४९ मायक्रोग्रॅम पर क्युबीक मीटर एवढं प्रमाण आढळलंय.
या शहरांची हवा श्वास घेण्यासाठी योग्य नसल्याचं या अभ्यासातून पुढे आलंय. प्रदुषण कमी करण्यासाठी काही सूचनाही प्रदूषण नियंत्रण महामंडळाने केल्या आहेत.
औरंगाबाद शहर डेंजर झोनमध्ये आल्याचं महापौरांनीही मान्य केलं आहे. प्रदूषण महामंडळाने दिलेल्या सुचनांवर काम सुरु केल्याचे ते म्हणाले.
रस्त्यावरची धुळ, जाळण्यात येणारा कचरा, औद्योगिक प्रदूषण, बेसुमार वृक्षतोड यामुळे हवा प्रदूषित होण्याचं प्रमाण वाढंत चाललंय. आरोग्यावर याचा विपरित परिणाम होतोय. सर्वच शहरी भागांमध्ये ही समस्या वाढत आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढणं ही काळाची गरज आहे.