आरोपाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा

समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या नवाब मलिक यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे

Updated: Nov 1, 2021, 05:27 PM IST
आरोपाचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,  चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा title=

पुणे : संकटात सापडलेले शेतकरी, महिलांवरील वाढलेले अत्याचार, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aaghdi Government) कोणाला तरी उभे केले जाते. त्याच पद्धतीने अल्पसंख्यांक कल्याणमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) बेछूट आरोप करत आहेत. पण भारतीय जनता पार्टी (BJP) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना या वादात ओढण्याचे गंभीर परिणाम मलिक यांना भोगावे लागतील, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिला आहे

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, राज्यात महापूर आला. अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात ३८ लाख हेक्टरवरील पीक वाहून गेले, ११ लाख हेक्टर शेतजमीन खरडून गेली. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळायची आहे. त्यांना पीक विमा मिळायचा आहे. विशेष जास्त पाऊस नसतानाही पूर का आला, याची अद्याप चौकशी झालेली नाही. 

कोरोनासाठी जे काही थोडे पॅकेज राज्य सरकारने जाहीर केले त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप चालू आहे आणि २९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे शेकड्यांनी वाढले आहेत. अशा गंभीर विषयांवर बोलण्यासारखे काही नसल्याने महाविकास आघाडीकडून बेछूट आरोप करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप केले. पण वानखेडे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. भारतीय जनता पार्टीही अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.  ते म्हणाले की, नीरज गुंडे हे चांगले सामाजिक कार्यकर्त आहेत. पण तरीही त्यांच्याविरोधात काही पुरावे आढळले तर चौकशी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि कोणाच्या विरोधात काही पुरावे असतील तर बिनधास्त चौकशी करावी. पण प्रसिद्धी माध्यमांसमोर आक्रोश कशाला करता ? रोज तोंडाची वाफ का दवडता ? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.