चेतन कोळस / येवला, नाशिक : Onion Farmers News : कांदा शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. निफाडच्या विंचूरमध्ये कांद्यानं शेतकऱ्यांना अक्षरश: रडवले आहे. विंचूर उपबाजार आवारामध्ये झालेल्या लिलावात शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या लहान कांद्याला 51 रुपये क्विंटल म्हणजेच किलोमागे फक्त 5 पैशांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे हाताश झालेल्या शेतकऱ्यांनी आपला कांदा पुन्हा घरी आणला. उत्पादन खर्च दूरच राहिला. वाहतूक खर्चही परवडत नसल्यानं शेतकरी रडकुंडीला आला आहे.
येवला तालुक्यातील देशमाने येथील सुशील दुगड या शेतकऱ्याने लहान कांदा अर्थात गोल्टी कांदा विक्रीसाठी विंचूर येथील उपबाजार आवारात आणला. मात्र, काद्याला मिळणारा भाव पाहून त्यांना धक्काच बसला. तसेच नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीत कांद्याला कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्च तर सोडाच वाहतूक खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात सध्या कांद्याने पाणी आणले आहे.
लहान कांद्याल केवळ 51 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. मात्र, या कवडीमोल दरात कांदा विक्री करणे शक्य नसल्याने काही शेतकऱ्यांना आपला कांदा माघारी नेला आहे. 5 पैसे किलोचा बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.