महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार

 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra University of Health Sciences) नाशिक यांच्याद्वारे पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा विहीत वेळेनुसारच घेण्यात येणार आहे.  

Updated: Apr 10, 2021, 07:56 AM IST
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार
सोशल मीडिया

 मुंबई :  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra University of Health Sciences) नाशिक यांच्याद्वारे पूर्वघोषित वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांची लेखी आणि तोंडी परीक्षा विहीत वेळेनुसारच घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठात्यांनी कळविले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील आरोग्यविज्ञान आणि वैद्यकीविषयक विद्यापीठ आहे. याचे मुख्यालय नाशिक येथे आहे.  महाराष्ट्र राज्यामध्ये येणारी सर्व वैद्यकीय व निमवैद्यकीय अभ्यासक्रम या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. 

दरम्यान, राज्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने (Maharashtra Government)  MPSC ची 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता MPSC परीक्षा पुढे ढकला अशी मागणी विविध स्तरातून होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackray) यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अधिकारी यांच्याबरोबर व्हीसी मार्फत ही बैठक झाली. या बैठकीत  MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. 

फॅक्ट चेक : 'ही' परीक्षा नक्की पुढे ढकलली आहे का? 

प्रात्यक्षिक परीक्षा (practical exam been) पुढे ढकलल्याचे समाजमाध्यमांवर एक परिपत्रक जोरदार व्हायरल होत आहे. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेतली असताना अशी कोणतीही परीक्षा ढकलण्यात आलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे. सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाचा वापर करुन प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलल्याचा समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला संदेश आणि परिपत्रक खोटे असून त्यावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी केले आहे. 

सोलापूर येथील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय  यांच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलली आहे, अशा आशयाचे कार्यालयीन परिपत्रक समाजमाध्यमांवर व्हायरल झालेले परिपत्रक हे खोटे आहे. विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास ठेवू नये. कोरोना काळात अशा कोणत्याही अफवा किंवा पोस्ट व्हायरल करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे. लोक पॅनिक होतील, अशी पोस्ट टाकू नये, असे आधीच पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशा पोस्ट प्रसिद्ध केल्या तर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडूनही सांगण्यात आले आहे.