ताडोबात पहिल्यांदाच आढळला तणमोर पक्षी; मादी तणमोर पक्षाच्या नोंदीने पक्षी वैभवात मोठी भर

 भारतीय उपखंडात अभावानेच आढळतो. यातील नर पक्षी प्रजनन काळातील नृत्यासाठी प्रसिद्ध

Updated: Aug 4, 2021, 10:16 AM IST
ताडोबात पहिल्यांदाच आढळला तणमोर पक्षी; मादी तणमोर पक्षाच्या नोंदीने पक्षी वैभवात मोठी भर title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये दुर्मिळ तणमोर पक्षाची मादी आढळून आल्याने पक्षीप्रेमी मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. ही नोंद याच वर्षातील मे महिन्यात झाली आहे. याआधी नांदेड- नाशिक- सोलापूर- अकोला- चंद्रपूर या जिल्ह्यात तणमोर पक्षी आढळून आला होता. हा पक्षी बस्टर्ड परिवारातील सर्वात छोटा पक्षी आहे. तर "genus sypheotides" परिवारातील एकमेव सदस्य आहे. त्याला तणमोर अथवा लिख/ खरमोरे असेही म्हणतात. हा संपूर्ण भारतीय उपखंडात अभावानेच आढळतो. यातील नर पक्षी प्रजनन काळातील नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. याचमुळे त्याची शिकार देखील केली जाते.

पक्षी वैभव संवर्धनाच्या अभियानासाठी  भारत सरकारने 2006 या वर्षात तणमोर पक्षावर एक आकर्षक टपाल तिकीट जारी केले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅप नोंदींचे विश्लेषण करत असताना पथकातील सदस्यांना बस्टर्ड परिवारातील या आकर्षक पक्ष्याचे फोटो मिळाले. या तणमोर पक्ष्याचा पूर्ण वाढीचा पक्षी 510 ते 740 ग्राम एवढ्या वजनाचा असतो. नर 45 सेंटिमीटर लांबीचा तर मादी 50 सेंटिमीटर एवढी असते. बस्टर्ड परिवारातील एकूण ६ प्रजाती भारतीय उपखंडात आढळतात. त्यातील तणमोर- माळढोक प्रमुख आहेत.

बेंगाल फ्लोरिकन आणि तिच्या प्रजाती भारत- नेपाळ- कांबोडिया आदी देशात आढळतात. तर आणि ग्रेट बस्टर्ड आणि हुबारा आदी पाहुणे पक्षी म्हणून भारतात येतात. तणमोर पक्षाचा प्राथमिक निवास गवताळ प्रदेशात असतो. महाराष्ट्रात या पक्षाचे आधीची नोंद 2013 या वर्षी याच जिल्ह्यातील वरोरा येथे झाली आहे. तणमोर पक्षी साधारणपणे रबी पिकांच्या काळात आणि आसपास आढळून येत असल्याचे समजते. त्यामुळेच पारंपरिक पीकपद्धती या पक्षाला अधिवास प्रदान करते. तणमोर पक्षी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान नव्या पिढीला जन्म घालतो. याच पाऊसकाळात गवताळ प्रदेशात गवत वाढलेले असते. त्याचे भक्ष्य याच गवताळ प्रदेशातील कीटक आहेत.

प्रजनन काळात नर आपले क्षेत्र निर्धारित करतो. आणि नृत्य करत मादीला विविध प्रकारे आकर्षित करतो.  तणमोर पक्षी याच काळातील आपल्या विशेष उडी साठी प्रसिद्ध आहे. तो लागोपाठ व दीड ते दोन मीटर उंच उड्या मारतो. विशेष म्हणजे दिवसातून या उड्यांची संख्या 500 एवढी असते. यामुळेच वन्यजीव विश्वात तणमोराला ओळखणे सोपे जाते. मादी तणमोर दिसण्यास अनाकर्षक व कथ्या ( brown) रंगाची असल्याने जंगलात फारशी लवकर नजरेत येत नाही. 2018साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार देशात केवळ 264 पूर्ण वाढीचे तणमोर शिल्लक आहेत.

2000 सालापासून त्यांची संख्या 80 टक्‍क्‍यांनी खाली गेली आहे. तणमोर पक्षी अति दुर्मिळ अशा श्रेणीत सूचीबद्ध आहे. तणमोर पक्षी अत्याधिक शिकारीमुळे आपले अस्तित्व गमावून बसला आहे. आधुनिकीकरण आणि गवताळ प्रदेशाचे अतिक्रमण त्याच्या मुळावर उठले आहे. शेती पद्धतीत रासायनिक खते- फवारणीचा वापर आणि पीक पद्धतीत बदल यामुळेही हा पक्षी संकटात आला आहे.

आधुनिक काळातील अतिउच्च वीज वाहिन्यांचे जाळे व सोबतच स्थानिक नागरिकांना या पक्षाची माहिती नसणे हे देखील पक्षी संपण्यामागचे मोठे कारण आहे. तणमोर पक्ष्याला वाचविणे काळाची गरज आहे. त्यामुळे गवताळ प्रदेश वाचणार आहेत. हा पक्षी शेत पिकांवरील कीटकांचा नैसर्गिक भक्ष्यी आहे. त्या दृष्टीने तो शेतकरी मित्र देखील आहे. मात्र आता प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला सारख्या संरक्षित ठिकाणी त्याची नोंद झाल्याने या पक्ष्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.