नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ५८ महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलंय. विद्यापीठाने महाविद्यालयांची यादी जाहीर करून त्यांच्याशी विद्यापीठाचा कुठलाही संबंध नाही, असे जाहीर केले आहे. जून महिन्यात नागपूर विद्यापीठाने या २५६ महाविद्यालयांतील प्रथम वर्ष प्रवेशावर बंदी लावली होती. यातील 98 महाविद्यालयांची संलग्नताच रद्द करण्याचा प्रस्ताव होता. यातील अनेक महाविद्यालयांनी मागील सात ते आठ वर्षांपासून संलग्नीकरणाच्या नूतनीकरणासाठी अर्जच केला नव्हता.
यासंदर्भात महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आले होते. यानंतर ११ महाविद्यालयांनी संलग्नीकरण नूतनीकरणासाठी अर्ज केला. मात्र, ५८ महाविद्यालयांनी संपर्कच साधला नाही या महाविद्यालयांना पुन्हा नोटीस पाठविण्यात आली होती.
महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्यासंदर्भात अधिष्ठाता मंडळाने निर्णय घेतला होता.
त्यानंतर याबाबतचा प्रस्ताव विद्वत परिषदेला पाठविण्यात आला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या विद्वत परिषदेच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.