जालना : दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन (Farmers Protest) नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वादग्रस्त विधान भाजपचे नेते (BJP) आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातील टाकळी कोलते गावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी हा आरोप केला. या देशात आधी सिएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आले. पण यामुळे या एक तरी मुस्लिम देशाबाहेर गेला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. केंद्र सरकार स्वतःच्या तिजोरीतुन शेतकऱ्यांच्या हितासाठी पैसे खर्च करायला तयार आहे. पण बाकीच्या लोकांना हे मान्य नसून सध्या शेतकऱ्यांचे सुरु असलेल आंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे. या देशात आधी सिएए आणि एनआरसीमुळे उचकवण्यात आले. पण यामुळे एक मुस्लिम देशाबाहेर गेला का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
हे आंदोलन बाहेरच्या देशाचे षडयंत्र असून आपल्या देशातील लोकांनी याचा विचार केला पाहिजे, असेही दानवे म्हणाले. आंदोलन करणारे लोक हे सुटाबुटातील लोक आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे कोणाच्या भूल थापांना बळी पडू नका, असे आवाहन देखील दानवे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आपली भूमिका अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. जोपर्यंत कृषी कायदे ( farm laws) रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीमध्ये केंद्र सरकारकडून देण्यात आलेला प्रस्ताव सर्वमतांने फेटाळून लावण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आणखी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
१२ डिसेंबरपासून राजस्थान हायवे बॉर्डर जाम करणार आणि सर्व टोल नाके फ्री करण्याचे आंदोलन करणार आहेत. तर १४ डिसेंबर रोजी सर्व बॉर्डरवर आंदोलक एक दिवसीय उपोषण करणार आणि याच दिवशी देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आणि लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांनी रिलायन्स जिओ सिमवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले आहे.