जोडीदार मिळत नसल्यामुळे तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आईवडीलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली.  

Updated: May 11, 2019, 09:06 PM IST
जोडीदार मिळत नसल्यामुळे तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र title=

पुणे : आईवडीलांची देखभाल करणारी जोडीदार मिळत नसल्यामुळे पुण्यातील एका तरुणाने चक्क मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तशी मागणी या तरुणाने केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची दखल घेत या तरुणाचे मन वळवण्याचे पोलिसांना आदेश दिलेत. पुणे पोलिसांनाही या नैराश्यात सापडलेल्या तरुणाचे मन वळण्यात यश आले आहे. 

पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणारा एक ३२ वर्षांचा तरुण. चांगली नोकरी, चांगल्या परिसरात स्वतःचे घर. मात्र तरीही या तरुणाला कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही. आपल्या आजारी असणाऱ्या आई-वडिलांची देखभाल करणारी जोडीदार आपल्याला मिळावी हा त्याचा आग्रह आहे. त्यामुळे आलेले सर्वच स्थळ त्याला नाकारत आहेत. शेवटी नैराश्यात येऊन त्याने चक्क मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून इच्छामरणाची परवानगी मागितली.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही या पत्राची दखल घेत या तरुणाचे मन वळवण्यासाठी पुणे पोलिसांना आदेश दिलेत. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक देविदास घेवारे यांनी या तरुणाला शोधून त्याची भेट घेतली. त्याची समजूत काढली. यावेळी पोलिसांमधील माणूस समोर आला.

आजच्या या धकाधकीच्या जीवनात अगदी छोट्या मोठ्या कारणांनी नैराश्यात येऊन अनेक तरुण आत्महत्येचा मार्ग निवडतात. मात्र अशा नैराश्यात अडकलेल्या तरुणांना नुसतेच पोलिसच नाही तर तुम्ही आम्ही भरोसा देण्याची गरज आहे.