चिंता आणखी वाढली, राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Apr 28, 2020, 09:56 AM IST
चिंता आणखी वाढली, राज्यात  कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय
संग्रहित छाया

मुंबई, औरंगाबाद, नाशिक, जळगाव : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक मालेगावमध्ये एकाच दिवशी ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. आता येथील आकडा १५० पार झाला आहे. त्यामुळे येथे अधिक सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, औरंगाबाद येथे एका रात्रीत १३ रुग्ण कोरोना  पॉझिटीव्ह आढळले आहेत. औरंगाबादमधील रुग्णांची संख्या ९५ वर पोहोचली असून २४ तासात ४२ रुग्ण वाढले आहेत. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.  विदर्भात नागपूर येथेही रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जळगावात कोरोनाच सहा पॉझिटिव्ह

जिल्ह्यात सहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. सहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चार पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सहा रुग्णांपैकी तीन रुग्ण भुसावळ येथील तर जळगाव अमळनेर पाचोरा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या आढळून आलेल्या सहा  रुग्णांपैकी चार रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. तर दोन रुग्णाचा तपासणीसाठी दाखल होण्याअगोदरच मृत्यू तर दोन रुग्णाचा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली. मृत रुग्णांमध्ये भुसावळ मधील दोन तर पाचोरा जळगाव मधील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. जळगावात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४ झाली असून त्यातील ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पॉझिटिव्ह महिला रुग्णालयातून पळाली

औरंगाबाद येथील समतानगर येथील ६५ वर्षीय कोरोणा बाधित महिला  मिनी घाटी रुग्णालयातून पसार झाली होती. मात्र  पोलिसांच्या प्रयत्नांमुळे कोरोना पॉझिटिव्ह महिला शोधण्यात यश आले आहे. या महिलेला पोलिसांनी शोधून डॉक्टरांच्या  हवाली केले. एमआयडीसी चिकलठाणा पोलिसांची कारवाई केली आहे. या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये धक्कादायक बातमी हाती आली आहे. सकाळी सात वाजता आलेल्या अहवालानुसार एकूण  ३६ रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. २१  पुरुष , १४ महिला तसेच एक नऊ वर्षीय बालकाचा समावेश आहे. 

मालेगावात रुग्णांची संख्या दीडशे पार 

नाशिक मालेगावमध्ये मंगळवारी सकाळी आलेल्या अहवालात ३६ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. मालेगावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एकूण १६३ वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.

सोलापुरात तालुक्यांच्या सीमा बंद

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, मोहोळ, अक्कलकोट,उत्तर सोलापूर या चार तालुक्याच्या हद्दी बंद करण्यात आल्या आहेत. सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने खबरदारी घेण्यात आली आहे. या चार तालुक्याच्या सीमा सोलापूर शहरास लागून असल्याने नागरिकांचे सतत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सोलापूरशी असतो संबध असतो. पुढील धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तसा आदेश जारी केला आहे.