Pune Crime News : कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर मुहूर्त काढला जातो. बारामतीमध्ये चोरट्यांनी चोरी करण्यासाठी मुहूर्त काढला. चोरट्यांनी मुहूर्त काढून दरोडा टाकला पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही. अकेरीस तीन महिन्यांनी या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. बारामतीसह संपूर्ण पुणे ग्रामीण भागात चोरट्यांनी चोरीसाठी काढलेल्या या मुहुर्ताची चर्चा रंगली आहे.
आपल्याकडे सर्वसाधारणपणे चांगल्या कामासाठी मुहूर्त काढला जातो. मात्र एका चुकीच्या कामासाठी, म्हणजेच चक्क दरोडा घालण्यासाठी चोरट्यांनी मुहूर्त काढण्याचा प्रकार समोर आलाय. मात्र एवढं सगळं करूनही त्यांना नशिबाची साथ मिळाली नाही आणि त्यांची चोरी उघडकीस आली. बारामती मध्ये घडलेली ही घटना आहे.
घरात एकटी असलेल्या महिलेचे हातपाय बांधून, तिच्या तोंडात बोळा कोंबून घरातील तब्बल 95 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच 20 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. 21 एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान ही घटना घडली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला असून त्यात सहभागी सहा आरोपींना अटक केली आहे.
सचिन अशोक जगधने, रायबा तानाजी चव्हाण, रवींद्र शिवाजी भोसले, दुर्योधन धनाजी जाधव, नितीन अर्जुन मोरे आणि ज्योतिष असलेला रामचंद्र वामन चव्हाण या सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या रोख रकमेसह एकूण 76 लाख 32 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी बारामतीतील सागर गोफणे यांनी तक्रार दिली होती. सागर गोफणे यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पुणे ग्रामीण पोलिस ठाण्यात गोफणे यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर दरोडेखोरांचा तपास सुरु केला. पोलिस तीन महिन्यांपासून त्यांच्या मागावर होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटना स्थळ तसेच आसपासच्या परिसरातील अनेक CCTV फुटेज चेक केले. या CCTV फुटेजच्या मदतीने पोलिांनी दरोडेखोरांचा शोध घेतला. अखेरीस या दरोडेखोरांना जेकब्द करण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशी दरम्यान मुहूर्त काढून दरोडा टाकल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.